हनी ट्रॅप प्रकरण! व्हिडीओ बनवून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या ५ जणांच्या टोळीला अटक
By धीरज परब | Published: May 25, 2024 05:11 PM2024-05-25T17:11:08+5:302024-05-25T17:14:02+5:30
एका लॉज मध्ये नेऊन व्हिडीओ बनवत पैश्यांसाठी अपहरण करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या ५ जणांच्या टोळीला काशिगाव पोलिसांनी अटक केली.
मीरारोड : सुंदर तरुणीला पुढे करत एका लॉज मध्ये नेऊन व्हिडीओ बनवत पैश्यांसाठी अपहरण करत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या ५ जणांच्या टोळीला काशिगाव पोलिसांनी अटक केली असून त्यांना मंगळवार पर्यंत ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. ह्यात चार महिला आरोपी आहेत .
मीरारोडच्या पुनमसागर कॉम्प्लेक्स मधील ऑलंपिया इमारतीत राहणारे ६० वर्षीय हिंमतलाल दानजीभाई पांडव ह्या इस्टेट एजंट ना पिंकी नावाच्या तरुणीने काम पाहिजे म्हणून कॉल केला. शांती गार्डन मध्ये एकदा भेटल्या नंतर तिने पांडव यांना वरसावे येथील हिल टॉप लॉजवर खोलीत बोलवले. पांडव हे सुरेश शहा ह्या मित्रासह रूम वर गेले. त्यावेळी पिंकी हिने त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना ती मोबाईल मधून शूटिंग काढत असल्याचे लक्षात आले .
संशय आल्याने पांडव व शाह हे बाहेर निघाले असता पिंकी हिने तिच्या एका साथीदार तरुणीसह मिळून दोघांना धमकावत रिक्षात बसवले. रिक्षा उत्तन वरून गोराई दिशेने नेली. तेथे आणखी तीन महिला व पुरुष साथीदार होते व त्यांनी शाह आणि पांडव यांना मारहाण करत पैश्यांची मागणी केली. त्यांच्या कंदील ५ हजार रोख घेतल्या नंतर मीरारोड येथील एटीएम मध्ये नेले मात्र पैसे निघाले नाहीत. तेथून त्यांना बोरिवलीला नेले व प्रत्येकी १ लाख रुपये दुसऱ्या दिवशी सायंकाळ पर्यंत आणून द्या अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देत दोघांना पहाटे ३ च्या सुमारास पांडव यांच्या घराजवळ सोडून दिले .
जखमी पांडव यांच्या फिर्यादी नंतर काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक अभिजित लांडे सह उपनिरीक्षक किरण बघदाणे, ओमप्रकाश पाटील, धीरज राणे, राहुल वांकुज, मंगेश रक्षे, उमंग चौधरी, किरण विरकर, रिया राऊत, समृध्दी वर यांच्या पथकाने तपास सुरु केला . सीसीटीव्ही , तांत्रिक विश्लेषण आणि तपास कौशल्याच्या आधारे पिंकी उर्फ सोनाली महेंद्र महाले ( वय २८ वर्षे ) सुमन निवास, विजय नगर, नालासोपारा पूर्व ; निशा नागेश गायकवाड ( वय ४५ वर्षे ) व तिची मुलगी दर्शना ( वय वर्षे २२ ) रा. राज एन्क्लेव्ह, दिपक हॉस्पीटल जवळ, मीरा रोड ; दिपा रोहित प्रजापती ( वय ३८ वर्षे ) रा. दत्त निवास चाळ, नवघर गांव, भाईंदर पूर्व आणि मलीक अहमद फक्की ( वय २४ वर्षे ) रा. गुलामी पार्क, नया नगर, मीरा रोड अश्या ५ जणांना पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर ५ तासात अटक केली .
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, निशा गायकवाड हि वेश्या व्यवसाय साठी तरुणी पुरवण्याचे काम करते व पांडव यांच्याशी तिची जुनी ओळख होती . तिनेच सोनाली उर्फ पिंकी हिला पांडव यांना कॉल करून जाळ्यात ओढून व्हिडीओ बनवून देण्यास सांगितले होते. त्या प्रमाणे सोनालीने व्हिडीओ बनवून देण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला. त्यातूनच पांडव व शहा यांचे अपहरण , मारहाण व बलात्काराची धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रकार घडला . पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत . तर आरोपींनी अश्या प्रकारे आणखी कोणाला ब्लॅकमेल केले आहे का ? याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत .