१७ महिलांचे लैंगिक शोषण करणारी टोळी गजाआड, ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 10:37 AM2024-03-03T10:37:58+5:302024-03-03T10:40:09+5:30
आरोपींनी महाराष्ट्रातील विविध भागात १७ मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. यातील अटक आरोपीपैंकी बहुतेक आरोपी हे राबोडी भागातच वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
ठाणे : गरजू मुली अथवा महिलांना हेरून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या ७ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपींनी महाराष्ट्रातील विविध भागात १७ मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. यातील अटक आरोपीपैंकी बहुतेक आरोपी हे राबोडी भागातच वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.
या गुन्ह्यातील पीडित मुलीला पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीने दिशाभूल करून स्वत:च्या ताब्यात ठेवल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने पैशांचा पाऊस पाडणाऱ्या टोळीची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने व राबोडी पोलिसांनी समांतररित्या तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने अस्लम शमी उल्ला खान (५४), सलीम जखरुद्दीन शेख (४५), मांत्रिक बाबा साहेबलाल वजीर शेख ऊर्फ युसुफ बाबा (६१), तौफिक शेख (३०), शबाना शेख (४५), शबिर शेख (५३), हितेंद्र शेट्टे (५६, ) यांना अटक केली.
अशी करायचे फसवणूक
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, गरजू मुली अथवा महिलांना हेरून त्यांचा पैशाचा पाऊस पडतो, यावर विश्वास बसावा यासाठी त्यांना व्हिडीओ दाखवला जात होता. व्हिडिओमध्ये एक महिला नग्न अवस्थेत झोपलेली असून, तिच्या बाजूला पैशांचा ढिगारा पडलेला दिसत आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रलोभन दाखवून त्यांना धार्मिक विधी करण्यासाठी तयार केले जात होते. मांत्रिक पैशांचा पाऊस पाडण्याची पूजा करीत असताना हजर असलेल्या व्यक्तीच्या अंगात जीन येईल व त्याची पूजेला बसलेली नग्न महिला, मुलीसोबत संभोग करण्याची इच्छा होईल. त्याला शरीरसुख दिल्यावरच पैशांचा पाऊस पडेल, असे आरोपींनी पीडित मुलींनी सांगितले. या भूलथापांवर राज्यभरातील १७ मुली, महिला बळी पडल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहायक पोलिस आयुक्त नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी व आदींच्या पथकाने कारवाई केली.