पोलिस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणारे टोळके जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Published: February 21, 2023 07:41 PM2023-02-21T19:41:38+5:302023-02-21T19:42:35+5:30
पोलिस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आले.
ठाणे : पोलिस असल्याची बतावणी करीत एका व्यापाऱ्याला पळवून नेत खोटया गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्याच्याकडून दोन लाखांची खंडणी उकळणाऱ्या संजय म्हात्रे (४५, रा. भिवंडी) याच्यासह पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून पोलिसांच्या बनावट ओळखपत्रासह आठ लाख ६० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भिवंडीतील एक व्यापारी मुस्ताक अहमद अन्सारी (४०, रा. भिवंडी, ठाणे ) हे २७ जानेवारी २०२३ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून त्यांच्या घरी जात होते. त्यावेळी एका मोटारकारमधून आलेल्या पाच जणांच्या टोळीने त्यांना अडवून पोलीस असल्याची बतावणी करीत मारहाण करून मोटारीमध्ये कोंबून नवी मुंबईत पळवून नेले. तिथे खोटया गुन्हयात अडकविण्याच्या धाकावर दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीनंतर दोन लाखांची रक्कम घेऊन वारंवार धमकावून आणखी तीन लाखांची मागणी केली. याप्रकरणी निजामपुरा पोलिस ठाण्यात धमकी देणे, खंडणी उकळणे, अपहरण करणे आणि मारहाण केल्याच्या कलमांखाली ९ फेब्रुवारी २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. मोबाईल फोन क्रमांकाच्या तांत्रीक विश्लेषणाद्वारे तसेच गुप्त खबºयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संजय म्हात्रे याच्यासह कैलास पतंगे (३०), निखील जोशी (२६) सागर चिंचोळे (२६, चौघेही राहणार भिंवडी ) यांचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना भिवंडीतून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये इतर साथीदारांसह या गुन्हयाची त्यांनी कबूली दिली. त्यानंतर त्यांना ११ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांचा पाचवा साथीदार इम्रान शेख (४०, रा. ठाणे ) यालाही १८ फेब्रुवारी रोजी अटक केली.
आरोपींकडून गुन्हयातील दोन मोटारकार, मुंबई पोलीसांचे बनावट ओळखपत्र, पोलिस उल्लेख असलेली पाटी, पोलिसांच्या लाठया व टोप्या, तक्रारदारांचा मोबाईल फोन, खंडणी म्हणून स्विकारलेल्या रकमेपैकी ४० हजार ५०० रुपये असा आठ लाख ६० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी संजय म्हात्रेविरुद्ध यापूर्वी मुंबई ठाण्यासह राज्यभरात सात पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पतंगे याच्याविरुद्ध भिवंडीमध्ये फसवणूकीचा तर इम्रानविरुद्ध पालघर आणि मुंबईतील पोलिस ठाण्यांमध्ये दरोडा आणि फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.