आव्हाडांना गुंतवण्याचा मोठा डाव, ५ खोक्यांची ऑफर; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितली इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 10:58 PM2023-04-10T22:58:36+5:302023-04-10T23:00:31+5:30
ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत, तर आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत.
ठाणे - राज्यात सत्तानंतर झाल्यानंतर ठाण्यातील राजकारणात सातत्याने काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्याचे असल्याने ठाणे जिल्हा सध्या केंद्रबिंदू बनलाय. त्यातच, शिवसेना ठाकरे गटानेही ठाणे जिल्ह्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आव्हाड आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातत्याने ठाण्यातील गुन्हेगारी आणि पोलिसांवर सरकारचा दबाव असल्याचं सांगतात. तर, इतरही बाबतीत ते सरकारवर टीका करतात. मात्र, आता जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्याचा हालचाली सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी केलाय.
ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत, तर आनंद परांजपे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाडांना अडकवण्याचा प्रयत्न होत असून पोलिस यंत्रणांवर त्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं परांजपे यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे ३ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात आरोपींना ५ खोक्यांची ऑफर देऊन त्यांना जितेंद्र आव्हाड यांचे नाव न्यायालयात घेण्याचं सांगण्यात येतंय, असा आरोप आनंद परांजपे यांनी केलाय.
महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता नीच पातळी गाठली आहे. 3 वर्षांपूर्वी झालेल्या एका धक्काबुक्की प्रकरणात की, ज्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड स्वत: आरोपी आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणी कलम 324 अन्वये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास करा असे आदेश दिले आहेत. परंतु, पोलीस पुढील तपास न करता जितेंद्र आव्हाडांना कसे गुंतवता येईल यासाठी मागचाच तपास पुन्हा करीत आहेत आणि आतातर मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. काही आरोपींना 5 खोके ऑफर करण्यात आले आहेत की, तुम्ही मा. न्यायालयामध्ये जितेंद्र आव्हाड मारत होते असे सांगा. त्यांना एक जुना व्हिडीओ दाखवला जातो आणि त्या व्हिडीओमध्ये पोलीसच दाखवतात की, ‘हा बघा जितेंद्र आव्हाड’ आणि सांगतात ‘हा आहे ना’ मग तुम्ही लिहून द्या की, जितेंद्र आव्हाड होते. वास्तविक त्या व्हिडीओमध्ये काहीच दिसत नाही. दलालाचे नाव RD असल्याचं परांजपे यांनी ट्विटरवरुन सांगितलंय.
महाराष्ट्रातील राजकारण्यांनी आता नीच पातळी गाठली आहे. 3 वर्षांपूर्वी झालेल्या एका धक्काबुक्की प्रकरणात की, ज्या प्रकरणात जितेंद्र आव्हाड स्वत: आरोपी आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणी कलम 324 अन्वये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास करा असे आदेश दिले आहेत.
— Anand Paranjpe (@paranjpe_anand) April 10, 2023
पोलीस देखिल ह्या प्रकरणातील आरोपींना खोटं-नाटं सांगत आहेत. तुम्हांला 15 वर्षे सजा होईल, जन्मठेप लागेल. तुमचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा ! पोलीसांना ह्या गुन्ह्यात इतका इंटरेस्ट का ?, असा सवालही त्यांनी विचारलाय. तसेच, गुन्हा तर फक्त कलम 324 चा आहे. कारण, सिवील हॉस्पिटलने दिलेले सर्टिफिकेट हे Simple Injury चे आहे. मग ऐका... ह्यामध्ये कोणाला इंटरेस्ट आहे आणि आम्हांला हे का कराव लागतयं ? याची माहिती नकळत पोलीस कर्मचाऱ्यांच्या तोंडातून निघाली. ह्यामध्ये इंटरेस्ट कोणाला आहे आणि कोणाचा दबाव आहे? असा प्रश्न आनंद परांजपे यांनी विचारलाय. तसेच, परांजपे यांच्या आरोपामुळे आता RD कोण हाही चर्चेचा विषय बनलाय.