पूर्ववैमनस्यातून पाच जणांच्या टोळक्याने केला तरुणाच्या खूनाचा प्रयत्न

By जितेंद्र कालेकर | Published: December 24, 2023 09:10 PM2023-12-24T21:10:55+5:302023-12-24T21:11:03+5:30

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा: लोखंडी रॉडने केला हल्ला

A group of five people tried to kill the young man due to previous enmity | पूर्ववैमनस्यातून पाच जणांच्या टोळक्याने केला तरुणाच्या खूनाचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून पाच जणांच्या टोळक्याने केला तरुणाच्या खूनाचा प्रयत्न

ठाणे: दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून हर्ष याच्यासह पाच जणांच्या टोळक्याने विवेक राजे (१७, रा. तुळशीधाम, ठाणे) याला लोखंडी रॉडने तसेच हॉकी स्टीकने जबर मारहाण करीत त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी दिली.

कोपरी सर्कल बारा बंगला भागात २२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विवेक राजे हा त्याच्या मित्रांसह उभा होता. त्याचवेळी हर्ष, साहू आणि त्याच्या मित्रांनी दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन विवेकला शिवीगाळ केली. हर्ष याने हाताच्या चापटीने मारहाण करुन त्याच्या खिशातून जबरदस्तीने मोबाईल काढून घेतला. त्यानंतर धक्का बुक्की करीत शिवीगाळ करुन ज्ञानसाधना कॉलेजजवळील मेंटल हॉस्पीटलकडे जाणाऱ्या चौकातील मेडिकल समोर आणले. त्याठिकाणी हर्ष, बाबू, साहू तसेच त्याच्या दोन ते तीन मित्रांनी हाताच्या बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतरही जबरदस्तीने स्कूटरवर बसवून अंबिकानगर पाईपलाईनजवळ ब्रिजखाली वागळे इस्टेट येथे आणून हर्ष याने लोखंडी रॉडने हॉकीस्टीक, बांबू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी त्यांच्या अन्य दोन मित्रांनी लाकडी दांडक्याने तर त्याचा मित्र प्रणव याने लोखंडी हत्याराने विवेकच्या डोक्यावर आणि हातावर वार करुन गंभीर दुखापत केली. यातील जखमी विवेकला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी पाच जणांच्या टोळक्याविरुद्ध २३ डिसेंबर रोजी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.

Web Title: A group of five people tried to kill the young man due to previous enmity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.