ठाण्यात १० फूट खोल नाल्यात पडलेल्या घोड्याची अथक प्रयत्नानंतर सुटका
By जितेंद्र कालेकर | Published: December 12, 2022 09:18 AM2022-12-12T09:18:01+5:302022-12-12T09:18:45+5:30
ठाणे अग्निशमन दलाचे मदतकार्य: रेतीबंदर येथील घटना
ठाणे: मुंब्रा रेतीबंदर रोड सेवा मार्गावरील एका दहा फूट खोल नाल्यात पडलेल्या घोड्याची ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केल्याची घटना रविवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. घोड्याच्या मागील दोन्ही पायांना मार लागल्यामुळे त्याच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंब्रा रेतीबंदर सेवा मार्गावरील एका नाल्याच्या चेंबरमध्ये समीर शेख यांच्या मालकीचा घोडा अडकल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती. त्याच आधारे एक रेस्क्यू वाहन आणि खाजगी जेसीबी मशीनसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. साधारण, एक तासांच्या अंतराने रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास या घोड्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी जेसीबी मशीनच्या (खाजगी मशीन) मदतीने सुखरुप सुटका केली. घोड्याच्या मागील दोन्ही पायांना दुखापत झाल्याने घोडा मालक शेख यांनी पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.