आंघाेळीला गरम पाणी देण्यावरुन झालेल्या वादातून पतीचा पत्नीवर सुरीने खूनी हल्ला
By जितेंद्र कालेकर | Published: February 5, 2024 08:54 PM2024-02-05T20:54:36+5:302024-02-05T20:54:48+5:30
पतीला अटक : कोपरी पोलिसांची कारवाई
ठाणे: आंघाेळीला गरम पाणी ठेव आणि माळयावरुन तेलाचा डबा काढून द्या, असे पत्नी कुसूम मालुसरे (२७) हिने पती ज्ञानेश्वर मालुसरे (३७) यांना सांगितले. आपल्याला काम सांगितल्याचा राग आल्याने त्याने तिला शिवीगाळी केली. त्यावर शिवीगाळी करु नको, असे बजावणाऱ्या पत्नीच्या गळयावरच चाकूने वार करीत तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी कोपरीमध्ये घडली. याप्रकरणी पती ज्ञानेश्वर याला अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी सोमवारी दिली.
ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील आनंदनगर परिसरातील रहिवाशी ज्ञानेश्वर याचा ४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या पत्नीसोबत कौटुंबिक वाद झाला होता. पत्नीने माळयावरुन तेलाचा डबा काढून द्या आणि आंघाेळीसाठी गरम पाणी ठेवा, असे त्याला काम सांगितले. हे काम सांगितल्यामुळे हा वाद विकोपाला गेला. यातूनच ज्ञानेश्वर याने पत्नीचे तोंड दाबून गळयावर सुरीने वार करुन तिला ढकलून दिले. घराचा दरवाजाही बंद केला.
त्यानंतर तिच्या छातीच्या खाली पोटावर डाव्या बाजूलाही त्याने सुरीने वार करुन खूनाचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर लादीवर सांडलेले रक्त बारदाणाने पुसून लादीही त्याने साफ केली. रक्ताने माखलेले बारदाण, तिचे कपडे आणि सुरी त्याने आनंदनगर येथील नाल्यामध्ये फेकून देत पुरावाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कहर म्हणजे ‘पोलिसांमध्ये तक्रार देऊ नकोस, नाहीतर तुला मारुन टाकीन, जिवंत सोडणार नाही’, असा दमही तिला भरला. या घटनेनंतर कुसूम हिला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोर पतीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रणजित ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय नलावडे हे करीत आहे.