चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या पतीस २४ तासांत अटक
By जितेंद्र कालेकर | Published: October 11, 2024 10:38 PM2024-10-11T22:38:06+5:302024-10-11T22:38:23+5:30
नौपाडा पोलिसांची कारवाई: रेल्वेतून उतरून ट्रॅकवरून पळताना पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नीचा गळा दाबून खून करून पसार झालेल्या भास्कर सदावर्ते (३०) या आरोपीला अवघ्या २४ तासांमध्ये अटक केल्याची माहिती नौपाडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प्रिया ढाकणे यांनी शुक्रवारी दिली. त्याला १२ ऑक्टाेबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
सिद्धेश्वर तलावाजवळ राहणारा भास्कर हा बसचालक म्हणून नोकरी करतो. त्याची २७ वर्षीय पत्नीही खासगी ठिकाणी नोकरीला आहे. तो त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावरून संशय घेत असल्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. याच कारणावरून तो तिला मारहाणही करीत होता. ८ ऑक्टाेबर रोजी पहाटेच्या सुमारास भास्कर आणि त्याची पत्नी यांच्यात पुन्हा याच कारणावरून भांडण झाले. याच भांडणातून त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला व पसार झाला. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भांगे, उपनिरीक्षक मेहबूब मकानदार, हवालदार राजेंद्र गायकवाड, साहेबराव पाटील, विलास देसाई, सचिन रांजणे आणि ईश्वर गोलवड आदींच्या पथकाने भास्कर याचा कामाच्या ठिकाणी, तसेच नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र, ताे मिळला नाही. तो नांदेड येथील मूळ गावी रेल्वेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो कसारा भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने कसारा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला. त्याचवेळी तो रेल्वेतून उतरून ट्रॅकवरून पळून जात असताना, या पथकाने पाठलाग करून त्याला पकडले.