पत्नीशी भांडण करणाऱ्या पतीला दोघा मेव्हण्यांची जबर मारहाण; वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Updated: August 22, 2024 22:23 IST2024-08-22T22:23:00+5:302024-08-22T22:23:10+5:30
याप्रकरणी दत्ता वाघमारे आणि विनोद वाघमारे या दोन मेव्हण्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी दिली.

पत्नीशी भांडण करणाऱ्या पतीला दोघा मेव्हण्यांची जबर मारहाण; वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा
ठाणे: पती पत्नीमध्ये झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी दोन मेव्हण्यांनी परशुराम जाधव (३३, रा. शास्त्रीनगर, ठाणे) या वाहन चालक असलेल्या आपल्या भावोजीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दत्ता वाघमारे आणि विनोद वाघमारे या दोन मेव्हण्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी दिली.
परशुराम जाधव हे १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी झोपलेले होते. त्यावेळी दत्ता आणि विनोद हे दोन मेहुणे त्यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी या दोघांची बहिण आणि परशुराम यांची पत्नी सोनी हिच्याबरोबर झालेल्या वादाचा जाब विचारला. परशुराम आणि सोनी यांच्यात १६ ऑगस्ट रोजी घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्याच रागातून ती कुर्ला येथे तिच्या बहिणीकडे रागाने निघून गेली होती.
ती १७ ऑगस्ट रोजी पुन्हा परत आली होती. त्यामुळे नाश्ता करुन परशुराम हे झोपले होते. त्याच दरम्यान तिथे नाशिक येथून दाखल झालेल्या दत्ता आणि विनोद या दोन भावांनी पती पत्नींमधील भांडणाचा जाब विचारत परशुराम यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या डोक्याला तसेच छातीवर, कमरेवर आणि उजव्या पायावर मार लागला. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून मारहाण करणाऱ्या दोन्ही मेव्हण्यांविरुद्ध १९ ऑगस्ट रोजी दाखल केला आहे.