स्मार्टफोन आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर कायदेशीर बंदी आणावी; भालचंद्र नेमाडे स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 09:41 PM2023-03-23T21:41:49+5:302023-03-23T21:42:43+5:30
स्मार्टफोनमुळे मेंदुचा एकच भाग काम करतो हे न्युरोलॉजिस्टनं देखील सिद्ध केलं आहे. तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचं प्रमाण आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत भयंकर आहे.
ठाणे-
स्मार्टफोनमुळे मेंदुचा एकच भाग काम करतो हे न्युरोलॉजिस्टनं देखील सिद्ध केलं आहे. तसंच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचं प्रमाण आपल्याकडे इतर देशांच्या तुलनेत भयंकर आहे. या दोन्ही गोष्टी चुकीच्या असून सरकारनं कायदेशीररित्या यावर बंदी घातली माहिती, असं रोखठोक मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं आहे. ते 'लोकमत' आयोजित 'साहित्य पुरस्कार २०२३' सोहळ्यात बोलत होते.
धर्म आणि राष्ट्रीयतेमुळे देशाचं नुकसान, भालचंद्र नेमाडेंचं परखड मत; 'अच्छे दिन' काय तेही सांगितलं!
साहित्यविश्वातील उत्तुंग लेखक आणि कवींचा सन्मान करणारा 'लोकमत साहित्य पुरस्कार' आज ठाण्यात पार पडला. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ अशा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. यावेळी नेमाडे यांची छोटेखानी मुलाखत देखील घेण्यात आली.
नेमाडे यांनी यावेळी स्मार्टफोन आणि इंग्रजी भाषेच्या वाढलेलं प्रस्थ यावर आपलं मत व्यक्त केलं. "युरोपात आता मोबाइलवर बंदी आणायचं चाललं आहे. मोबाइलमुळे मेंदुतील ५०-६० सेंटर्स असतात त्यापैकी फक्त एकच सेंटर काम करतं. तुमच्या मेंदुचा एकच भाग काम करतो. मोबाइल तुम्ही वापरू लागलात की तुमचं एकच सेंटर काम करतं हे न्युरोलॉजिस्टनंही सिद्ध केलं आहे. त्यामुळे कायदेशीररित्या मोबाइलवर बंदी घातली गेली पाहिजे", असं नेमाडे म्हणाले.
इंग्रजी मीडियम शाळांवर बंदी आणा
ज्या पद्धतीनं स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घालण्याची गरज आहे तशीच गरज आज देशात इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही घातली गेली पाहिजे असं मत नेमाडे यांनी व्यक्त केलं. "कोरिया, चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी हे कुणीच इंग्रीज शिकवत नाहीत. तिथं दोन-चार लोक इंग्रजी शिकून घेतात. पण आपल्या देशात ४०-५० टक्के लोक इंग्रजी शिकतात. इंग्रजी मीडियममध्ये शिकतात हे चुकीचं आहे. तसंच ७०-८० टक्के लोक मोबाइल वापरू लागले हे चुकीचं आहे. हे कायद्यानेच बंद करण्याची परिस्थीती आज आहे. शेवटी सरकार कशासाठी आहे", असा सवाल उपस्थित करत नेमाडे यांनी इंग्रजी मीडियम शाळांबाबत आपलं मत व्यक्त केलं.