स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठी मोर्चा; एकनाथ शिंदे यांचा पलटवार
By अजित मांडके | Published: June 30, 2023 06:37 PM2023-06-30T18:37:25+5:302023-06-30T18:38:13+5:30
'कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले.'
मोर्चा कोणी कोणावर काढायचा, हा प्रश्न आहे, गेली २० ते २५ वर्षे मुंबईत सत्ता कोणाची होती हे सर्वांनाच माहित आहे, त्यांनी केवळ आपली घरे भरली, मुंबईकारांना मात्र सुविधांसाठी वंचित ठेवले, कोवीडमध्ये माणसे मरत असतांना ते कोवीडच्या नावाखाली लुट करीत होते. कोवीड मृतदेहाच्या बॅगमध्ये पैसे खाण्याचे मोठे पाप त्यांनी केले. भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला आणि मड्याच्या टाळू खाण्याचे काम त्यांनी केले.
दरोडा घालायचा आणि चोरी केली म्हणून बोलायचे अशा प्रकारच्या वृत्तीला मुंबईकर चोख उत्तर देतील. मुंबईकराच्या डोळ्यात धुळ फेकता येणार नाही, तुम्ही जे काही केड्रीट घेतले त्याचे सत्य बाहेर येईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे आणि आदीत्य ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली. हा मोर्चा स्वत:ची काळी करतुते झाकण्यासाठीच काढला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना, भाजप युती सरकारची वर्षपुर्ती झाल्याच्या निमित्ताने ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थितीत जनतेशी संवाद साधला, तसेच यावेळी लहान मुले, सफाई कामगार, पोलीस यांच्या समवेत केक कापून वर्षपुर्तीचा आनंद साजरा केला.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही टिका केली. २०१९ शिवसेना, युती घोषीत त्यानंतर सत्तेत युतीचे सरकार येणे अपेक्षित होते. परंतु दुर्देवाने महाविकास आघाडीचे सरकार आले. कोवीडच्या नावाखाली फडणवीसांच्या योजना बंद केल्या, प्रकल्प थांबविले गेले. मुख्यमंत्री आपला असतांनाही सरकार कोण चालवित होते, शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. म्हणून शिवसेना वाचविण्यासाठी, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी भलतच धाडस करावे लागले, ते सोपे नव्हते. परंतु महाराष्टÑाच्या जनतेत, शिवसेनेच्या आमदारांमध्ये जे काही घडत होते, उद्रेक होता,त्याला वाचा फोडण्याचे काम शिंदे यांनी केले. त्यातून हे सरकार स्थापन झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पहाटेच्या शप्पथविधी ची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून शरद पवार म्हणाले मी गुगली टाकली आणि देवेंद्र फडणवीस याना क्लीन बोल्ड केले पण खरी विकेट अजित पवारांचीच गेली असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला. तर विरोधीपक्ष नेते अजित पवार हे मनातून बोलत नाहीत तर त्यांना बोलावे लागत असल्याचे शिंदे म्हणाले.