पवार, शेलार गटाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती
By अजित मांडके | Published: October 17, 2022 06:53 PM2022-10-17T18:53:18+5:302022-10-17T18:53:54+5:30
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसंदर्भात बैठक पार पडली असून त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती.
ठाणे : राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुध्द भाजप, बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात विस्तव देखील जात नसल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे एमसीएच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढत असल्याचे दिसत आहे. ठाण्यात या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. खेळात राजकारण नको अशी भूमिका यावेळी उपस्थितांनी विषद केल्याचे सांगितले जात आहे. तसेच ठाण्यात क्रिकेटचे महत्व वाढविण्यासाठी दादोजी कोंडदेव क्रिडा गृहात आयपीएलचे सामने व्हावेत अशी इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमसीएकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुक होऊ घातली आहे. या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि भाजपचे आशिष शेलारे हे एकत्र पॅनलमध्ये निवडणुक लढविताना दिसत आहेत. त्याच अनुषंगाने ठाण्यातील एका हॉटेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, मिलिंद नार्वेकर, विहंग सरनाईक, आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वानखेडे मैदानाचा इतिहास यावेळी आव्हाड यांनी उलघडला. तर सुनील गावस्कर क्रिकेटसाठी कशा पध्दतीने लोकलने प्रवास करायचे असे सांगत जुन्या आठवणींनी उजाळा दिला. यावेळी उपस्थित सर्वच जण भारावल्याचे दिसून आले. तर प्रत्येक गोष्टीत राजकारण आणता कामा नये, एखाद्याला जर खेळायचे असेल तर त्याला त्याच्या गुणवत्तेवर खेळूद्या त्याच्यासाठी राजकार येता कामा नये असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यातही सिलेक्शन कमिटीमध्ये त्यातील प्राविण्य असलेल्यांना प्राधान्य द्यावे, जेणो करुन त्यात राजकीय दबावा आला नाही पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
राजकारण्यांची जोड ही प्रशासकीय कामकाजात असणो गरजेचे आहे, जेणो करुन एखाद्या खेळाडूच्या काही अडचणी असतील त्या सुटु शकतील असेही त्यांनी सांगितल्याची माहिती सुत्रंनी दिली. क्रिकेटसाठी ठाण्यासाठी कशा पध्दतीने सोई, सुविधा देतील यावर देखील चर्चा झाली. याशिवाय घोडबंदरला क्रिकेटचे मैदान व्हावे अशी मागणी सरनाईक यांनी केल्याची माहिती सुत्रंनी दिली. नवीन कमिटी यावर योग्य तो निर्णय घेईल असेही त्यांनी सांगितले. असोसिएशनच्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती सुत्रंनी दिली. तसेच दादोजी कोंडदेव क्रिडागृहात आयपीएलचे सामने व्हावेत यासाठी त्यांनी एमसीएला सुचना देखील केली.