अल्पवयीन मुलीवर लग्नाच्या अमिषाने बलात्कार, आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Published: August 12, 2023 02:24 PM2023-08-12T14:24:38+5:302023-08-12T14:24:54+5:30
ठाणे पोक्सो न्यायालयाचा निकाल: भिवंडीतील घटना
ठाणे: एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मोहम्मद इस्लाम उर्फ बब्बू उर्फ शाहरुख गुलाम हुसैन इंद्रेसी (२३) याला ठाण्याच्या अतिरिक्त सत्र आणि विशेष पोस्को न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी २० वर्षे सश्रम कारावासाची तसेच ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ३०० दिवसाच्या साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आरोपीला भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
ठाणे जिल्हयातील भिवंडी परिसरात राहणारी ही १३ वर्षीय मुलीचे नववीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर २०१८ मध्ये तिने शाळा सोडली होती. पिडित मुलीची त्याच भागातील रहिवासी असलेल्या बब्बू याच्याशी एप्रिल २०१८ मध्ये त्यांच्याच किराणा मालाच्या दुकानात ओळख झाली होती. या मुलीची आई नसतांना तो तिच्याशी मैत्रि करण्यासाठी त्यांच्या किराणा दुकानात नेहमी यायचा. यातूनच ओळख झाल्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे, अशी बतावणी करीत त्याने तिच्यावर १० ते १५ वेळा लैंगिक अत्याचार केले. पुढे भीतीपोटी तिने घरात कोणताच प्रकार सांगितला नाही. अखेर तिची मासिक पाळी बंद झाल्यानंतर ती चार ते पाच महिन्यांची गरोदर राहिल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. त्यानंतर मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. याप्रकरणी १८ नोव्हेंबर २०१९ रोजी बब्बू याच्याविरुद्ध बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याखाली (पोक्सो) पडघा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सहायक पोलिस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली होती. तो १९ जानेवारी २०२० ते ११ आॅगस्ट २०२३ या कालावधीमध्ये ठाणे कारागृहातच आहे. दरम्यान, याच खटल्याची सुनावणी ठाणे न्यायालयात ११ आॅगस्ट रोजी झाली. विशेष सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी पिडितेची बाजू मांडली. साक्षी पुरावे पडताळल्यानंतर आरोपीला पोक्सोअंतर्गत २० वर्षे सश्रम कारावासाबरोबरच दहा हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास १०० दिवसांची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
त्याचबरोबर पोक्सो -६ नुसार २० वर्षे सश्रम कारावासाची आणि २० हजारांच्या दंडाची तसेच दंड न भरल्यास २०० दिवसांच्या साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही सुनावली. दोन्ही शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगाव्या लागणार आहेत. पैरवी अधिकारी म्हणून आप्पा सानप आणि बी. जी. तारमाळे यांनी काम पाहिले.