लोकअदालतमध्ये पुन्हा रचला नवा इतिहास, ठाण्यात साडेचार कोटींची झाली तडजोड
By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 28, 2024 05:43 PM2024-09-28T17:43:39+5:302024-09-28T17:45:08+5:30
गेल्यावर्षी एका प्रकरणात २ कोटी ८५ लाखांची मदत लोकन्यायालयाने मिळवून दिली होती.
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: लोक न्यायालयात पुन्हा एकदा नवा इतिहास रचला गेला. टँकरच्या धडकेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना एका खाजगी इन्शुरन्स कंपनीकडून साडेचार कोटींची मदत मिळवून देण्यात ठाणे लोकन्यायालयाला यश आले. मोटार अपघात प्राधीकरणाकडे हे प्रकरण दाखल करण्यात आले होते. हा दावा शनिवारी मोटार अपघात प्राधीकरणाचे सदस्य, न्यायमूर्ती एस. एन. शाह यांच्या कोर्टात निकाली काढण्यात आला. गेल्यावर्षी एका प्रकरणात २ कोटी ८५ लाखांची मदत लोकन्यायालयाने मिळवून दिली होती.
अपघातात मृत पावलेली व्यक्ती (वय ३७ वर्षे) ही व्यवसायाने कम्पुटर इंजिनिअर होती आणि ती कांजुरमार्ग येथील एका खाजगी कंपनीत कामाला होती आणि काही दिवसांनी ते याच कंपनीच्या अमेरिका येथील कार्यालयात रुजू होणार आहे. मात्र त्या दरम्यान त्यांचा अपघात झाला. नावडा फाटा येथे ९.१२.२०२२ रोजी सकाळी ७.२० वाजता ते मासळी घेण्यासाठी स्कुटरवरुन जात असताना पाठीमागून एका सिमेंटच्या टँकरने धडक दिली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी ॲड. जी. ए विनोद यांच्या माध्यमातून मोटार अपघात प्राधीकरणाकडे एका खाजगी इन्शुरन्स कंपनीकडे दावा दाखल केला. ॲड. विनोद यांंनी फक्त भरपाई म्हणून दावा दाखल केला. हे प्रकरण आज निकाली काढून ती अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना मिळवून देण्यात आले. या प्रकरणात इन्शुरन्स कंपनीचे अमृता सिन्हा आणि स्वप्निल पिंपळखरे यांनी देखील मेहनत घेतली.
शनिवारी लोकन्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन शिरसिकर, मुख्य न्यायदंडाधिकारी, ठाणे एस के फोकमारे, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे सदस्या, न्यायमुर्ती एस एन शाह , प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी सुतार, के एस कातकाडे, पुजा माने, एस जी. खेतवाल यांच्या उपस्थितीत या रक्कमेचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.