जलजीवन, स्वच्छ भारत, घरकुलच्या कामांकडील दुर्लक्ष भाेवणार; अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांना नोटीस
By सुरेश लोखंडे | Published: April 7, 2023 05:33 PM2023-04-07T17:33:44+5:302023-04-07T17:33:56+5:30
ठाणे जिल्ह्यातील जलजीवन, स्वच्छ भारत, घरकुलच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
ठाणे : जिल्ह्यात गावखेड्यांसाठी उपयुक्त असलेले जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधान मंत्री आवास योजना, जनसुविधा, नागरी सुविधा, कर वसुली, पंधरावा वित्त आयोग, घरकुलांची रखडलेली कामे १५ मेपर्यंत पूर्ण करा, अन्यथा नाेकस नाेटीस देऊन धडक कारवाई करण्याचा बडगा उगारण्यात येईल, असे खडे बाेल ग्राम सेवकांसह संबंधीत अधिकार्यांना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी सुनावले.
येथील जिल्हा परिषदेने शहापूर पंचायत समितीच्या शेतकरी भवनमध्ये सीईओ यांनी विविध कामांची आढावा बैठक गुरूवारी घेऊन अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी त्यांनी विविध कामांची प्रत्यक्षपणे पाहाणी केली. या दौऱ्यासह आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख खाते प्रमुख, जिल्हा प्रकल्प संचालक छाया सिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अर्जु न गाेळे, शहापूर गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे आदींसह विभाग प्रमुख, शाखा अभियंता. विस्तार अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक उपस्थित होते. १५ मे पर्यंत घरकुल योजनाची रखडलेली सर्व कामे पुर्ण करणे. स्वच्छ भारत मिशन टप्पा २ च्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली एक हजार ५०० लोकसंख्या असलेल्या गांवाची कामे १५ दिवसात पूर्ण करण्याची तंबी सीईओ यांनी या बैठकीत दिली. अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शहरातील जीव घेण्या प्लॅस्टीकचा वापर लक्षात घेऊन गांवखेड्यात यास वेळीच आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेने प्लास्टिक व्यवस्थापनसाठी पुढाकार घेतला. या कामास सुरुवात केली असून भिवंडी, अंबरनाथ, शहापूर येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.प्लॅस्टिक पुणर्वापर औद्योगिक क्षेत्रात महत्त्वचे योगदान ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रात इंधनाच्या स्वरूपात प्लॅस्टिक वापरले जाणारे आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत प्लास्टिक पासून रस्ता तयार करण्यात येणार आहे. भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी एक मेट्रिक टन प्लॅस्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोटेक कंपनी पुढाकार घेतल्याचे उघड झाले आहे.