प्रेमाखातर अपहरण केलेल्या साडे वर्षाच्या मुलाची चार तासातच वालीव पोलिसांनी केली सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 08:13 PM2024-10-19T20:13:58+5:302024-10-19T20:14:19+5:30
फरार दुसऱ्या महिलेचा पोलीस शोध घेत तपास करत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- वालीवमध्ये प्रेमाखातर अपहरण केलेल्या साडे तीन वर्षांच्या चिमुकल्याची चार तासात सुटका करून एका महिला आरोपीला अटक करण्यात वालीव पोलिसांना यश मिळाले आहे. वालीव पोलिसांनी सुटका केलेल्या मुलाला त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले आहे. फरार दुसऱ्या महिलेचा पोलीस शोध घेत तपास करत आहे.
हवाईपाड्याच्या अब्दुल रेहमान चाळीत दिनेश गौतम हे त्यांची पत्नी प्रिती व दोन्ही मुलांसह राहतात. साडे तीन वर्षांचा प्रिन्स हा त्याच्या बहिणीसोबत शनिवारी साडे नऊ वाजता परिसरातील सक्सेस क्लासेसला शिकवणीसाठी गेला. सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास एक महिला क्लासेसला आली व प्रिन्सला त्याच्या आईने बोलावले असून त्याला औषध देण्याचे आहे. त्यानंतर ती महिला प्रिन्सला सोबत घेऊन गेली. त्याची आई ११ वाजता घरी नेण्यासाठी क्लासला गेल्यावर तिथे प्रिन्स मिळून आला नाही. त्यानंतर शिक्षिकेने एक महिला प्रिन्सला घेऊन गेल्याचे सांगितल्यावर आजूबाजूला त्याचा शोध सुरू केला पण तो सापडला नाही. मुलाच्या घरचे हे प्रकरण घेऊन वालीव पोलीस ठाण्यात आले.
वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकासह ५ वेगवेगळ्या टीम तयार केल्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. त्यात एक महिला प्रिन्सला घेऊन जाताना दिसली. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि सचिन सानप यांनी आरोपी महिला साबरीन शेख (२२) हिला बांद्रा येथून ताब्यात घेतले. अपहरण केलेल्या प्रिन्सला नायगांव येथे एका नातेवाईकाकडे ठेवल्याची माहिती आरोपी महिलेने पोलिसांना दिली. पोलिसांच्या एका टीमने नायगांव येथून प्रिन्सला ताब्यात घेत अपहरणाच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
आरोपी साबरीन हिचे प्रिन्सचा काका ब्रिजेश (२५) याच्यासोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पण प्रिन्सचे वडील दिनेश यांचा लग्नाला विरोध असल्याने त्यांना धडा शिकवण्यासाठी हा अपहरणाचा बनाव साबरीनने रचला होता. आरोपी साबरीन ही क्राईम पेट्रोल आणि सिंघम तीन या चित्रपटात साईड ऍक्टर म्हणून काम करत असल्याचे सूत्रांकडून कळते.