जेजुरीच्या रुग्णावर ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात पार पडली गुडघ्यावरील ऑथाेर्स्काेिपिक शस्त्रक्रिया
By जितेंद्र कालेकर | Published: December 28, 2023 09:40 PM2023-12-28T21:40:30+5:302023-12-28T21:42:03+5:30
विनाटाक्यांच्या शस्त्रक्रियेतून गुडघ्यावर लिगामेंट प्रत्यारोपण
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जेजुरी येथून आलेल्या राहूल कदम (३२) या रुग्णाची गुडघ्यावरील लिगामेंट प्रत्यारोपण शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पडली. विनाटाक्यांची अत्यंत किचकट अशी ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच जिल्हा रुग्णालयात तीही अगदी मोफत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या चमूने केली. त्यामुळे कदम यांनी जिल्हा रुग्णालयाचे आभार मानले आहेत. राहुल कदम यांच्या गुडघ्यातील लिगामेंट तुटलेली असल्याने त्यांना चालण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. गुडघ्यावर लिगामेंटची शस्त्रक्रिया करण्यासाठी तीन ते चार लाखांचा खर्च त्यांना खासगी रुग्णालयात पुण्यामध्ये सांगण्यात आला होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने हा खर्च त्यांना पेलवणार नव्हता.
ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात अशी शस्त्रक्रिया होऊ शकते, अशी माहिती त्यांना मिळाल्यानंतर ते चार दिवसांपूर्वी प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळ स्थालांतरीत झालेल्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. धीरज महांगडे, डॉ. बाबासाहेब चव्हाण, डॉ. विशाल आचार्य आणि भूलतज्ज्ञ डॉ. प्रियंका महांगडे आदींच्या चमूने २८ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० ते ९.३० या एक तासांमध्ये ही किचकट शस्त्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने केली. गुडघ्यात लिगामेंट जोडणी (एसीएल) करण्यात आली. यासाठी गुडघ्यातील तुटलेली लिगामेंट काढून त्याजागी जवळची एक नस काढून दुसरी लिगामेंट प्रत्यारोपण करण्यात आली. अगदी आधुनिक पद्धतीने अगदी विनाटाक्यांची ही शस्त्रक्रिया ठाण्यात पार पडल्याने कदम यांनी जिल्हा रुग्णालयाच्या या चमूचे आभार मानले आहेत.