अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरण: अनिल जयसिंगांनी यांचा शिवसेना प्रवेश कोणी घडवून आणला?, चर्चेला उधाण
By सदानंद नाईक | Published: March 18, 2023 07:53 PM2023-03-18T19:53:47+5:302023-03-18T19:54:56+5:30
जयसिंगांनी यांच्या कुटुंबासह फोटो असलेले स्थानिक नेत्यांचे टेंशन वाढल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.
उल्हासनगर : शिवमंदिर फेस्टिव्हल कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल जयसिंगांनी हा महाविकास आघाडी फिरून आल्याचे वक्तव्य केले. मात्र जयसिंगांनी त्यांचा शिवसेनेत प्रवेश कोणी घडवून आणला? असा प्रश्न शहर शिवसेनेतून होत आहे. तसेच जयसिंगांनी यांच्या कुटुंबासह फोटो असलेले स्थानिक नेत्यांचे टेंशन वाढल्याचे चित्र शहरात निर्माण झाले आहे.
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेलिंग करणाऱ्या अनिष्काचा वडील अनिल जयसिंगांनी हे राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक व क्रिकेट बुक्की असल्याचे उघड झाले. विविध गुन्हे दाखल झाल्यावर जयसिंगांनी, गेल्या ८ वर्षांपासून फरार आहे. जयसिंगांनी यांनी क्रिकेट सट्टाचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला. या फोटोवरून भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरे गटाला टार्गेट केले. तसेच अंबरनाथ येथील शिवमंदिर फेस्टिव्हल कार्यक्रमात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनिल जयसिंगांनी महाविकास आघाडी फिरून आला असून पोलीस अधिक चौकशी करीत असल्याचे संकेत दिले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुक्की असलेला व गेल्या ८ वर्षांपासून फरार असलेल्या अनिल जयसिंगांनी याला शिवसेनेत कोणाच्या शिफारशीनुसार ठाकरे यांनी प्रवेश दिला. याचा मुख्यमंत्री शिंदे यांनी खुलासा करावा. अशी मागणी शहर शिवसेना ठाकरे गटाकडून होऊ लागली आहे. जयसिंगांनी यांच्या प्रवेशवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कोण होते. असा प्रश्नही विचारला जात असून शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सोबत पक्ष प्रवेश वेळीचा अनिल जयसिंगांनी यांचा फोटो व्हायरल झाला. तसे फोटो अन्य नेत्या सोबत जयसिंगांनी तसेच त्याच्या मुलाचे व मुलीचे आहेत. त्या सर्वांची चौकशी होणार का? असा प्रश्नही विचारला जात आहे. भाजपचे स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी मात्र अनिल जयसिंगांनी यांना ओळखत नसल्याचे सांगून हात वर केले आहे.
शहरातील अनेक नेते टेन्शन मध्ये
माजी नगरसेवक व क्रिकेट बुक्की असलेला अनिल जयसिंगांनी यांचे व मुलगा-मुलीचे विविध पक्षातील स्थानिक नेते, अधिकारी यांच्या सोबत फोटो आहेत. ते फोटो व्हायरल होण्याच्या भीतीने अनेक नेते टेन्शन मध्ये आल्याचे चित्र शहरात आहे.