दुकानात घुसून रोखले पिस्तुल, तीनवेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने दुर्घटना टळली
By धीरज परब | Published: October 13, 2023 07:45 PM2023-10-13T19:45:15+5:302023-10-13T19:45:26+5:30
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाण्याच्या समोरच एका केक दुकानात हेल्मेट घालून शिरलेल्या हल्लेखोराने पिस्तुल रोखत दुकानातील काऊंटर वर असणाऱ्या च्या दिशेने गोळीबार करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला. परंतु गोळी न सुटल्याने जिवीत हानी झाली नाही
काशीमीरा नाक्यावर सनराईज हॉटेल शेजारी इंटरनॅशनल बेकरी नावाचे मोठे दुकान आहे. इब्राहिम यासिन पटेल उर्फ बाबू यांचे हे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास एक हेल्मेटधारी तरुण दुकानात शिरला. त्याने पिशवीतून पिस्तुल काढून काऊंटरवर असणाऱ्यांच्या दिशेने रोखले. त्याने तीनवेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण गोळी काही सुटली नाही. त्यामुळे तो बाहेर पडला व दुचाकीवरून त्याच्या साथीदारासह पसार झाला.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त जयंत बजबळे, सहाय्यक आयुक्त महेश तरडे, काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुराडे सह पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून काशीमीरा व गुन्हे शाखेचे पोलिस तपसास लागले आहेत.
इब्राहिम पटेल यांचे जागे वरून वाद तसेच अन्य काही वादाचे प्रकार आहेत का ? याची चौकशी पोलिस करत आहेत. गोळी खरंच सुटली नाही की घाबरवण्याचा प्रयत्न होता ? अश्या दोन्ही शक्यता पोलिस सूत्रे वर्तवत आहेत. हल्लेखोर कोणत्या दिशेने आले व कोणत्या दिशेने गेले या माहितीसाठी सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.
आरोपींच्या दुचाकीवर क्रमांक नसल्याची शक्यता आहे. ते दुचाकीवरून निलकमल नाका कडून दुकाना जवळ आले आणि गोळी झाडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यावर मुंबईच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.