राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन
By अजित मांडके | Published: November 21, 2022 07:53 PM2022-11-21T19:53:33+5:302022-11-21T19:54:13+5:30
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन ठाण्यात आंदोलन करण्यात आले.
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात राज्यात पडसाद उमटत असताना, सोमवारी ठाण्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांचा निषेध करीत, त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. याचदरम्यान शिवसेनेच्या रणरागिणींनी त्यांच्या पुतळ्याला पायाखाली तुडवले. यावेळी असे बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांची तातडीने उचलबांगडी करावी, अशी मागणीही लावून धरण्यात आली.
शिवसेनाठाणे जिल्हा शाखेच्या वतीने राज्यपालांच्या बेताल वक्तव्याचा सोमवार सायंकाळी 'निषेध' आंदोलन टेंभी नाक्यावरील आनंद दिघे यांच्या पुतळ्यासमोर करण्यात येणार आहे. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ठाणे लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, माजी नगरसेवक नरेश मणेरा यांच्या शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत, मोठया प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यांनी तो प्रतिकात्मक पुतळा पायाखाली तुडवत आपला रोष व्यक्त केला. यावेळी बोलताना, जिल्हाप्रमुख केदार दिघे, यांनी शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची देशात नाहीतर जगभरात ओळख आहे. महाराजांबद्दल अवमानकारक शब्दात केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. त्याचा आम्ही निषेध नोंदवत आहे. तर अशाप्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांची तातडीने उचलबांगडी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.