अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या धार्मिक शिक्षकाला सश्रम कारावासाची शिक्षा
By जितेंद्र कालेकर | Published: August 24, 2023 08:36 PM2023-08-24T20:36:45+5:302023-08-24T20:37:01+5:30
ठाणे न्यायायालयाचा निकाल
ठाणे: मदरसामध्ये शिक्षण घेणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मोहम्मद सरताज शेख (३५, रा. मुंब्रा , ठाणे)
या धार्मिक शिक्षकाला (मौलाना) ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ५० दिवसांच्या साध्या कैदेची अतिरिक्त शिक्षाही आरोपील भोगावी लागणार आहे.
पीडित मुलगी ही १६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंब्रा भागातील एका मदरसामध्ये अरबी शिक्षणासाठी गेली होती. त्यावेळी मोहम्मद शेख या मौलानाने या मुलीची लैंगिक छळवणूक करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पिडितेने याबाबतची माहिती दिल्यानंतर मुलीच्या आईने या मौलानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तिथून पसार झाला होता.
याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो अंतर्गत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्हयात मुंब्रा पोलिसांनी शेख याला अटक केली होती. सरकारी अभियोक्ता रेखा हिवराळे यांनी या खटल्यामध्ये पिडितेची बाजू मांडली. सर्व बाजू पडताळल्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि विशेष न्यायाधीश पोक्सो व्ही. व्ही. विरकर यांनी आरोपीला २४ ऑगस्ट रोजी पाच वर्षांची शिक्षा सुनावली. पोलिस नाईक विद्यासागर कोळी यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.