उसने दिलेले पैसे परत मागितल्याने निवृत्त पोलिसाची निर्घृण हत्या
By पंकज पाटील | Published: April 19, 2023 07:31 PM2023-04-19T19:31:10+5:302023-04-19T19:31:18+5:30
हत्येनंतर मृतदेह मुरबाड तालुक्यातील धरणाशेजारी पुरला.
बदलापूर : उसने पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने निवृत्त पोलीसाची हत्या करून मृतदेह मुरबाड तालुक्यातील धरणाशेजारी पुरल्याचा प्रकार बदलापूरमध्ये घडला आहे. या प्रकारानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी तपासाची सूत्र वेगाने फिरवत अवघ्या २४ तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
बदलापूर पश्चिमेला अशोक मोहिते हे निवृत्त पोलीस कर्मचारी वास्तव्याला होते. त्यांच्याच सोसायटीत आरोपी महादू बाजीराव वालकोळी हा देखील भाड्याने राहत होता. एकाच सोसायटीत राहत असल्याने अशोक मोहिते आणि महादू वालकोळी यांची चांगली ओळख होती. याच ओळखीतून वालकोळी याने मोहिते यांच्याकडून २ लाख रुपये उसने घेतले होते. हे उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी मोहिते यांनी महादूच्या मागे तगादा लावला होता. मात्र पैसे देऊ शकत नसल्याने महादू याने मोहिते यांचाच काटा काढण्याचा डाव रचला.
मोहिते यांना दम्याचा त्रास असल्याने आमच्या गावात एक व्यक्ती दम्यावर औषध देतो, अशी बतावणी करत महादू याने अशोक मोहिते यांना मुरबाड तालुक्यातील देवघर धरणाच्या परिसरात नेलं. तिथे महादू आणि त्याचा साथीदार लक्ष्मण गोटीराम जाधव या दोघांनी मिळून मोहिते यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह देवघर धरणाच्या परिसरात दलदलीत पुरला. यानंतर आपल्यावर कुणाला संशय येऊ नये, यासाठी त्याने इमारतीचा वॉचमन आणि अशोक मोहिते यांच्या मुलाला फोन करून काका घरी आहेत का? अशी विचारणा केली. तर दुसरीकडे मोहिते यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला मी ठाण्याला असल्याचा मेसेज केला.
यादरम्यान मोहिते हे हयात असल्याचं दर्शवण्यासाठी त्याने मोहिते यांचं एटीएम कार्ड वापरून त्यांच्या खात्यातून २५ हजार रुपयांची रक्कम काढली. मात्र हे करत असताना तो सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. याच दरम्यान त्याने एका चेकद्वारे मोहिते यांच्या खात्यातून काही रक्कम आपल्या खात्यात वर्ग केली. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिकच बळावला. यानंतर त्याचा शोध घेत पोलिसांनी त्याला मुरबाड तालुक्यातून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच मोहिते यांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी देवघर धरणाच्या परिसरातून अशोक मोहिते यांचा मृतदेह ताब्यात घेतला.