एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर शिवसेनेच्याच रिक्षाचालकाकडून आत्महत्येचा प्रयत्न
By जितेंद्र कालेकर | Published: June 17, 2023 03:50 PM2023-06-17T15:50:29+5:302023-06-17T15:52:19+5:30
गुन्हा दाखल असतांनाही मागितला रिक्षाचा परवाना: रिक्षाचालक शिवसेनेचा पदाधिकारी
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेर विनय पांडे या रिक्षाचालकाने स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा शनिवारी सकाळी प्रयत्न केला. निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. प्रादेशिक परिवहन कायार्लयाने (आरटीओ) रिक्षाचा नवीन परवाना देण्यास नकार दिल्याने हताश होऊन त्याने हे टाेकाचे पाऊल उचलले.
मुख्यमंत्रीही एकेकाळी रिक्षा चालवत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची व्यथा कळू शकते, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला परवाना आणि बॅज देण्यात कायदेशीर अडचणी असल्याचे आरटीओकडून त्याला सांगण्यात आले हाेते.
ठाण्यातील लुईसवाडी येथील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या शुभदीप साेसायटीच्या बाहेर सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्यान ठाणे महापालिकेने खरेदी केलेल्या यांत्रिक पद्धतीने सफाई करणाऱ्या दोन यंत्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम झाल्यावर मुख्यमंत्री ठाण्यातून मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शिवसेनेच्याच शिंदे गटाचा पदाधिकारी असलेला रिक्षाचालक पांडे त्याठिकाणी आला. त्याने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याला तसे करण्यापासून अटकाव केला. त्यानंतर त्याला सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पाेलिसांनी वागळे इस्टेट पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती एका वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्याने दिली.
आंदोलनाचा गुन्हा असल्याने परवाना नाकारला -
रिक्षाचालकांचे २००२ मध्ये आंदोलन झाले होते. याच आंदाेलनाचा र्विनय पांडे याच्या विरुदध गुन्हा दाखल झाला हाेता. त्याने रिक्षाचा नवीन परवाना आणि बॅजची मागणी केली हाेती. मात्र, आंदाेलनाच्या गुन्हयामुळे रिक्षाचा नवीन परवाना त्याला आरटीओने नाकारल्याचे पांडे याचे म्हणणे आहे. हा परवाना नसल्यामुळे घरातही पत्नीसाेबत त्याचे खटके उडत हाेते. यातूनच वैफल्यग्रस्त झाल्याने त्याने हे टाेकाचे पाउल उचलल्याचे बाेलले जात आहे.