भिवंडीत रिक्षा चालकाची मुजोरी; शाळकरी मुलीस शेजारी बसविण्याचा केला आग्रह
By नितीन पंडित | Published: December 19, 2022 03:20 PM2022-12-19T15:20:45+5:302022-12-19T15:24:07+5:30
याप्रकरणी जखमी विद्यार्थिनीच्या वडिलांनी अज्ञात मुजोर रिक्षा चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडी - भिवंडी शहरातील रिक्षा चालकांवर कोणत्याही यंत्रणांचे नियंत्रण नसल्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी वाढली असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. एका मुजोर रिक्षा चालकाने अकरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीस आपल्या सोबत चालकाच्या पुढील सीट वर बसण्याचा आग्रह धरला असता विद्यार्थिनीने त्यास नकार दिल्याने रिक्षा चालकाने रिक्षा भरधाव वेगाने चालविली ज्यामध्ये ही भयभीत झालेली शाळकरी विद्यार्थ्यांनीचा तोल जाऊन ती रस्त्यावर पडून जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणी जखमी विद्यार्थिनीच्या वडिलांनी अज्ञात मुजोर रिक्षा चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अंजुरफाटा परिसरात राहणारी एक शाळकरी विद्यार्थिनी धामणकर नाका या परिसरातील शाळेत जाण्यासाठी एक अज्ञात रिक्षा चालकाच्या रिक्षात बसली होती. रिक्षा जैन मंदिर ओसवावललवाडी या परिसरात आल्यानंतर रिक्षाचालकाने विद्यार्थिनीस चालकासोबतच्या पुढीच्या सीटवर येऊन बसण्याचा आग्रह धरला. त्यास मुलीने नकार दिल्याने रागावलेल्या रिक्षा चालकाने रिक्षा भरधाव वेगाने चालविली ज्यामुळे बाजूला बसलेल्या विद्यार्थीनीचा तोल जाऊन ती रस्त्यावर पडली असता विद्यार्थिनीस दुखापत झाली. याबाबतची विद्यार्थिनींने आपल्या घरी जाऊन वडिलांना सांगितल्या नंतर वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून नारपोली पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.