ठाण्यात धावत्या दुचाकीने घेतला पेट; दोघे बचावले
By जितेंद्र कालेकर | Published: July 10, 2024 05:27 PM2024-07-10T17:27:06+5:302024-07-10T17:30:43+5:30
ठाणे महापालिका मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साईबाबा मंदिरासमोरच धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
ठाणे: पाचपाखाडीतील ठाणे महापालिका मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साईबाबा मंदिरासमोरच धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. आगीची घटना लक्षात सागर उतेकर या दुचाकीस्वाराने दुचाकी उभी करून बाजूला धाव घेतल्याने सागर याच्यासह दुचाकीवरून प्रवास करणारे दोघे बचावल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. ही मोटारसायकल अशोक उतेकर यांच्या मालकीची असून घटना घडली त्यावेळी सागर उतेकर हे दुचाकी चालवित होते. ते अन्य एकाला दुचाकीवरून घेऊन ठाणे स्टेशन येथून वागळे इस्टेट, सावरकर नगर येथे जात असतांना पाचपाखाडी, साईबाबा मंदिरासमोर येताच त्या दुचाकीला आग लागली.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे मनपा अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळविल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.