उद्यान विभागातील ठेका कामगारांच्या मागण्यांसाठी मीरा भाईंदर महापालिकेविरुद्ध अर्धनग्न आंदोलन
By धीरज परब | Published: August 12, 2024 07:27 PM2024-08-12T19:27:04+5:302024-08-12T19:27:28+5:30
पालिका मुख्यालया बाहेर ठिय्या देत कामगारांनी घोषणाबाजी केली . श्रमजीवीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेऊन चर्चा केली
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान विभागातील ठेका कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या मागण्या सातत्याने डावलल्या जात असल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने सोमवारी महापालिके बाहेर उघडे राहून आंदोलन केले . प्रशासनाने १५ दिवसात कामगारांच्या मागण्यां बाबत ठेकेदाराशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे .
महापालिकेच्या उद्यान आणि वृक्षप्राधिकरण विभागात ठेकेदारां मार्फत ठेक्याचे कामगार काम करतात . ठेकेदार मे . हिरावती एन्टरप्रायझेस यांचा किमान वेतन कायद्यानुसार वाढीव डीए चा फरक देणे आहे . मे . निसर्ग लँड्सकॅप ह्या ठेकेदाराने २०२१ ते २०२४ पर्यंतचा किमान वेतन कायद्या नुसार डीए चा फरक व सुट्टीचा पगार दिलेला नाही . उद्यान विभागात काम करणाऱ्या कामगारांना पावसाळी सॅन्डल आदी दिलेले नाही
कामगारांच्या ह्या मागण्यासाठी श्रमजीवी संघटनेने महापालिकेस अनेकदा पत्रव्यवहार केले होते . अधिकाऱ्यांना भेटून कामगारांना त्यांचा हक्क देण्याची मागणी केली होती . परंतु ठेकेदार आणि पालिका कामगारांना दाद देत नसल्याने सोमवार १२ ऑगस्ट रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याचे श्रमजीवी संघटनेने जाहीर केले होते .
संघटनेचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित व कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील, मीरा भाईंदर अध्यक्ष मंगेश मोरे ,शहर अध्यक्ष वसिम पटेल, उपाध्यक्षा जयश्री पाटील सह श्रमजीवीचे कार्यकर्ते - पदाधिकारी व कामगारांनी सोमवारी पालिके बाहेर आंदोलन केले . पुरुष पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंगावरचे शर्ट - बनियान काढून उघडे राहून आंदोलन केले .
पालिका मुख्यालया बाहेर ठिय्या देत कामगारांनी घोषणाबाजी केली . श्रमजीवीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांची भेट घेऊन चर्चा केली . सुरवातीला प्रशासनाने प्रलंबित मागण्यांसाठी ४५ दिवसांची मुदत मागितली होती . परंतु विवेक पंडित यांच्याशी भ्रमणध्वनी वरून चर्चा झाल्या नंतर प्रशासनाने १५ दिवसात कामगारांच्या मागण्यां बाबत निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले आहे . त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले . महापालिकेने लेखी दिल्या नुसार जर १५ दिवसांत कामगारांना त्यांचा हक्क दिला नाही तर पुन्हा आंदोलन केले जाईल . पण त्या आंदोलनात कामगार स्वतःचे कपडे उतरवणार नाहीत , तर हक्का साठी ठेकेदार आणि पालिकेची लक्तरे श्रमजीवी संघटना वेशीवर टांगेल असा इशारा श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी दिला आहे.