बँक कर्मचारी असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला सहा लाखांचा गंडा
By जितेंद्र कालेकर | Published: August 12, 2023 06:58 PM2023-08-12T18:58:04+5:302023-08-12T18:58:18+5:30
वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा, आरोपीचा शोध सुरू
ठाणे : बँक कर्मचारी असल्याची बतावणी करीत एका भामट्याने ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला ६ लाख १२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी शनिवारी दिली.
वर्तकनगर भागात राहणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार २४ ते २६ जुलै २०२३ या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये तिच्या वडिलांना एका अनोळखी मोबाइलधारकाने आपण ॲक्सिस बँकेतून बोलत असल्याचा बहाणा केला. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना ‘एनी डेस्क’ हे ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर भामट्याने या ज्येष्ठ नागरिकाला कॅनरा आणि ॲक्सिस बँक खात्यातून ६ लाख १२ हजार ३४ रुपये परस्पर ऑनलाईन वळते केले.
काही दिवसांनी वडिलांच्या बँक खात्यातून ही रक्कम दुसऱ्याच अनोळखीच्या बँक खात्यात वळती करून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे या महिलेच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित मोबाईलधारकाच्या क्रमांकांवर फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर याप्रकरणी या ५० वर्षीय महिलेने आरोपींविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केल्याचे पाेलिसांनी सांगितले.