हवाई प्रवास करुन ठाणे आणि भिवंडी परिसरात चोऱ्या करणारा अट्टल चोरटा जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Published: April 10, 2024 08:49 PM2024-04-10T20:49:03+5:302024-04-10T20:49:08+5:30
भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई, गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी:६२ लाख २४ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत
ठाणे: आसाम ते मुंबई असा हवाई प्रवास करुन भिवंडी, मुंबईसह ठाणे परिसरात चोैऱ्या करणाऱ्या मोईनुल अब्दुल मलीक इस्लाम (३४, रा. सामरोली गाव, आसाम) या सराईत चोरटयास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दोन भिवंडी पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली. त्याच्याकडून २२ चोरीच्या गुन्हयांमधील ६२ लाख २४ हजारांचे ८८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
चोरीचे वाढते गुन्हे लक्षात घेता, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अलिकडेच दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, उपायुक्त शिवराज पाटील यांनी विशेष पथकांची निर्मिती केली होती. भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक धनराज केदार, हवालदार अमोल देसाई, पोलिस नाईक सचिन जाधव, भावेश घरत आणि अमोल इंगळे आदींचे विशेष पथक तयार केले होते.
नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी करणाऱ्या अब्दुल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आसामचा रहिवासी असल्याची माहिती याच पथकाच्या तपासात समोर आली. अब्दुल यापूर्वी नवी मुंबईमध्ये वास्तव्याला होता. त्याच्याविरुद्ध नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. परंतू, सध्या तो फक्त चोरी करण्यासाठी विमान प्रवासाने मुंबईत येतो. चोरी केल्यानंतर पुन्हा विमानानेच प्रवास करुन आसाम आणि नागालँड या राज्यात लपण्यासाठी पळून जावून विविध ठिकाणी वास्तव्य करीत होता. त्याचा राहण्याचा कोणताही ठोस पत्ता नव्हता. तो मोबाईल फोनही वापरत नव्हता. डोक्यावर टक्कल असतांनाही ओळख लपविण्यासाठी तो केसांचा विग वापरत होता.
एका सीसीटीव्हीतील चित्रणात तो आढळल्याने या पथकाने त्याचा शोध सुरु केला. तेंव्हा तो रमजान महिना सुरु असल्याने आसाम राज्यातील मुळ गावी आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक धनराज केदार यांना मिळाली होती. त्याच आधारे त्याच्या मुळ गावी वेषांतर करुन मोटारसायकलवर फिरुन आसामच्या होजाई जिल्हयातील मुराजर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. पोलिसांकडून अटक टाळण्यासाठीही त्याने त्याच्या घराच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात झालेल्या दुखापतीचा फायदा घेत तो पोलिसांनाही तपासात सहकार्य करीत नव्हता. मात्र, तरीही त्याच्याकडे मोठया कौशल्याने तपास करुन ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई आणि नवी मुंबईतील २२ गुन्हयांचा सहभाग असल्याचे उघड केले. त्याच्याकडून ६२ लाख २४ हजारांचे सोनेही हस्तगत केले.
आरोपीवर भिवंडीतील नारपोली, भिवंडी शहर, शांतीनगर, भोईवाडा पोलिस ठाण्यातील ११ तर नवी मुंबईतील दोन आणि ठाण्यातील चार, कल्याणमधील चार तर मुंबई, भांडूपमधील एक असे २२ गुन्हे उष्घड झाले आहेत. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध नवी मुंबईत कोपरखैरणेमध्ये सहा तर वाशी पोलिस ठाण्यात एक असे सात गुन्हे दाखल आहेत. त्याचे आणखी कोणी सादार आहेत का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले.