कोपरीत भटक्या कुत्र्याने घेतला १३ जणांना चावा, नागरिकांत दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 08:26 PM2022-05-12T20:26:52+5:302022-05-12T20:27:46+5:30
या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढीस लागला आहे
ठाणे : ठाण्यातील पूर्व भागातील अष्टविनायक चौक परिसरात भटक्या कुत्र्याने १३ जणांचे लचके तोडले आहे. त्यामुळे कोपरी परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे चावा घेणाऱ्या या श्वानाचाही मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ठाण्यातील सावरकरनगर भागात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने ३४ जणांना चावा घेतल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा मनोरमा नगरमध्ये भटक्या कुत्र्यानी बालकांना लक्ष केले.
या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यातच ठाणे पूर्व भागातील कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढीस लागला आहे. ही कुत्री येणार्या जाणार्या लोकांवर भुंकत राहतात. त्यात याच परिसरातील एका इमारतीतील चार जणांचे चावेदेखील महिन्याभरापूर्वी घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. अशातच सोमवारी एकाच दिवसात अष्टविनायक चौक परिसरात राहणाऱ्या १३ जणांचे लचके तोडल्याची बाब समोर आली आहे. सुदैवाने चावा घेणाऱ्या लोकांमध्ये लहान मुलांचा समावेश नसला तरी, यामध्ये तीन ते चार महिलांसह एका वृद्धेला चावा घेतला आहे. त्यामुळे येथील नागरिक आता श्वानाच्या दहशतीखाली वावरत आहेत.
दरम्यान, ठामपा आरोग्य विभागाने नेमका श्वान कसा दगावला हे पाहणे आवश्यक आहे. त्या श्वानाला रेबीज आजार झाला होता. तसेच श्वानदंश झाल्यानंतर नागरिकांनी तातडीने लस घेतली असेल तर भीतीचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. श्वानाला नागरिकांनी मारल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोपरीतील अष्टविनायक चौक आणि आजूबाजूच्या परिसरात जवळपास १०० श्वानांचा वावर आहे. त्यातच मध्यंतरी एका मादी श्वानांने काही पिलाना जन्म दिला आहे. अशी श्वान संख्या वाढत राहिल्यास अशा घटनांमध्ये वाढ होईलच अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. कोपरीकडे ठामपा पशुवैद्यकीय विभागाचे लक्ष्य नसल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. ठाण्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असतांना, दुसरीकडे पशु वैदकीय विभागासह आरोग्य विभाग मात्र, कोमात असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी ठाण्यातील कोपरी भागात भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याच्या घटना घडलेल्या असताना, त्यांच्याकडे त्याची माहितीच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.
सरकारी रुग्णालयात इंजेक्शन घ्यावे
श्वानाचा मृत्यु कसा झाला हे समजू शकलेले नाही. एका प्राणीप्रेमी संघटनेने श्वानाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या अहवालानंतरच त्याच्या मृत्युचे कारण समजू शकेल. तसेच ज्या नागरिकांना श्वानाने चावा घेतला आहे, त्यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्यावे.
डॉ. भीमराव जाधव, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा.