मच्छिमारांनी लावली बाजी, खाडीमध्ये पडलेल्या 16 वर्षीय विद्यार्थिनीला वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 06:53 AM2022-07-24T06:53:44+5:302022-07-24T06:54:37+5:30
भाईंदर व नायगाव रेल्वे स्थानकांदरम्यान खाडीवर दोन मोठे रेल्वे पूल आहेत. रेल्वे पुलावर जाणे प्रतिबंधित आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावरून खाडीत पडलेल्या फातिमा जाफर शेख या १६ वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे प्राण त्या ठिकाणी असलेल्या दोघा अनोळखी तरुणांसह स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. रेल्वे पुलावर जाण्यास प्रतिबंध असताना विद्यार्थिनी तेथे पोहोचल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाईंदर व नायगाव रेल्वे स्थानकांदरम्यान खाडीवर दोन मोठे रेल्वे पूल आहेत. रेल्वे पुलावर जाणे प्रतिबंधित आहे. पुलावर बंदोबस्त ठेवला जातो. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फातिमा भाईंदर येथील खाडीवरील रेल्वे पुलावरून खाली पडली. त्यावेळी भाईंदर पूर्व व पश्चिम खाडीकिनाऱ्यावर जमलेल्या काहींनी तिला पाण्यात पडल्याचे पाहिले आणि एकच गलका झाला. पश्चिमेस असलेल्या दोघा तरुणांनी खाडीत उडी मारून फातिमाला वाचवले. थर्माकोलच्या साहाय्याने तिला धरून ते दोन्ही तरुण खाडीच्या प्रवाहात तग धरून होते. भाईंदर रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तरांनी पोलिसांना याची माहिती दिल्यावर खाडीकिनारी जेसलपार्क चौकीत असलेले उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी स्थानिक मच्छीमार देवा यांना बोट घेऊन येण्यास कळवले. देवा यांच्यासह राजू वैती व सहकाऱ्यांनी बोटीने जाऊन खाडीच्या पाण्यात असणाऱ्या त्या दोन्ही तरुणांना आणि मुलीला बोटीवर घेत किनाऱ्यावर आणले. त्या दोन तरुणांनी तत्काळ खाडीत उड्या मारून फातिमाला वाचवले नसते तर ती बुडून प्रवाहाबरोबर वाहून गेली असती.
फातिमा नालासोपारा येथे राहणारी आहे. महाविद्यालयात शिकणारी फातिमा पुलावर गेली आणि पाय घसरून खाली पडली, असे पोलिसांनी सांगितले. तिला भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर पालकांच्या स्वाधीन केले.