Thane Tanker Accident: टॅंकरने रोखली घोडबंदरची वाहतूक; डिझेल टॅंक फुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 09:47 AM2022-05-18T09:47:30+5:302022-05-18T09:47:57+5:30
तातडीने टँकर रस्त्याच्या एका बाजूला करण्याचे तसेच सांडलेल्या डिझेल आणि तेलावर माती पसरविण्याबरोबर पाण्याचा मारा करण्याचे काम हाती घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या टँकरचा डिझेल टॅंक फुटला. तसेच त्या टॅन्कमधील डिझेलसह गाडीतील तेल रस्त्यावर सांडल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रीजजवळ घडली. या घटनेने सुमारे तीन तासांसाठी घोडबंदर रोड रोखून धरला. तसेच उलटलेल्या टँकरमध्ये दहा टॅन केमिकल होते. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
दिलीप पाटील यांच्या मालकीचा केमिकल टँकर चालक दीपक यादव हे गुजरात अंकलेश्वर येथून रत्नागिरी,एमआयडीसी येथे टँकर घेऊन निघाले होते. मुंबई - गुजरात महामार्गावरील घोडबंदर रोडने ठाण्याच्या दिशेने जाताना, पातलीपाडा ब्रिजजवळ आल्यावर चालक यादव यांचे त्या टँकरवरील ताबा सुटला आणि रस्त्यावरील दुभाजकावर आदळून रस्त्याच्या मधोमध उलटला. यावेळी टँकर मधील डिझेल टॅंक फुटला आणि त्यामधील डिझेल रस्त्यावर सांडले तसेच गाडीतील तेल ही रस्त्यावर सांडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली.
Maharashtra | A tanker filled with Ethyl Benzyl Aniline (EBA) chemical capsized on Ghodbunder Road in Thane as the driver lost balance on its way to Ratnagiri last night. 2 people got injured. After 3hrs, the tanker was removed: Thane Municipal Corporation pic.twitter.com/91fDUVcUyB
— ANI (@ANI) May 18, 2022
तातडीने टँकर रस्त्याच्या एका बाजूला करण्याचे तसेच सांडलेल्या डिझेल आणि तेलावर माती पसरविण्याबरोबर पाण्याचा मारा करण्याचे काम हाती घेतली. यावेळी, दोन हायड्रा क्रेनच्या साहाय्याने तो टँकर उचलून बाजूला केला. तर, टँकरला साधारणपणे तीन तासांच्या प्रयत्नाने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतुक पूर्वपदावर आली. त्या अपघातग्रस्त टँकर मध्ये १० टन Ethyl Benzyl Aniline (EBA) केमिकल होते.अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.