उल्हासनगरात टोइंग गाडीची रिक्षाला धडक, रिक्षाचालकासह चौघे जखमी
By सदानंद नाईक | Published: October 17, 2023 06:53 PM2023-10-17T18:53:38+5:302023-10-17T18:53:52+5:30
टोइंग गाडी बंद करण्याची मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ नेताजी चौकात मंगळवारी दुपारी टोईंग गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने, रिक्षा चालक राकेश तिवारी गंभीर जखमी झाला. तर गौतम दादलानी या तरुणाला मार लागला असून दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. व्यापाऱ्यांनी टोईंग गाडी बंद करण्याची मागणी केली.
उल्हासनगरात पोलिसांची टोइंग गाडी वादात सापडली असून शहर पश्चिमेत व्यापाऱ्यांनी गाडी विरोधात तक्रारी केल्यानंतर, गाडी बंद करण्यात आली. तसाच प्रकार शहर पूर्वेतील नेताजी चौकात मंगळवारी घडला आहे. दुपारी नेताजी चौकात रस्त्यालगत लावण्यात आलेली मोटरसायकल उचलण्याच्या वेळी टोईंग गाडीने एका रिक्षाला जोरदार धडक देऊन भाटिया चौकाकडे फरफटत नेले. यामध्ये रिक्षाचालक राजेश तिवारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर गौतम दादलानी या जखमी तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. या प्रकाराने व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून टोइंग गाडी बंद करण्याची मागणी केली असून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरेश कृष्णांनी यांच्यासह अन्य व्यापाऱ्यांनी टोइंग गाडी बाबत नाराजी व्यक्त केली.
नेताजी चौकात टोइंग गाडी विरोधात व्यापारी रस्त्यावर उतरल्याने, टोइंग गाडीवरील चालक मारण्याच्या भीतीतून पळून गेला. हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन व्यापाऱ्यांची समजूत काढून रिक्षाचालक राकेश तिवारी याला रुग्णालयात हलविले. तसेच टोइंग गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत. नेताजी चौकातील अर्ध्या रस्त्या पर्यंत नागरिक व व्यापारी गाड्या उभ्या करीत असल्याने, वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यता आहे. वाहतूक पोलिस अश्या ठिकाणी कारवाई का करीत नाही?. असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.
टोइंग गाडी बंद केल्यास वाहतूक कोंडी
ऐन सणासुदीच्या काळात टोइंग गाडी बंद केल्यास, वाहतूक कोंडीची भीती व्यक्त होत आहे. व्यापारी व नागरिक बेशिस्तपने रस्त्यांवर वाहने पार्किंग करीत असल्यानेच टोइंग गाडी व व्यापारी यांच्यात वाद निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.