भिवंडीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू; पाच जण जखमी, एक जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:09 AM2023-09-03T06:09:56+5:302023-09-03T06:10:14+5:30
इमारत ४० वर्षे जुनी होती, मृतांमध्ये एका आठ महिन्याच्या चिमुरडीचा समावेश
Bhiwandi Building Collapse: शहरात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला असून शनिवारी मध्यरात्री एक धोकादायक दोन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.या दुर्घटनेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना ठीगाऱ्या खालून बाहेर काढण्यात भिवंडी अग्निशामक दलाला यश मिळालेला आहे. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
शहरातील गौरीपाडा धोबी तलाव येथील साहिल हॉटेल परिसरात असलेली अब्दुल बारी जनाब इमारत ही ४० वर्षांहून जुनी धोकादायक इमारत असून तळमजल्यावर यंत्रमाग कारखाना तर त्यावरील दोन मजली निवासी वापर आहे.या इमारती च्या मागील बाजूचा स्लॅब अचानक कोसळला.या दुर्घटनेत पहिल्या मजल्या वरील कुटुंब या ठीगाऱ्याखाली दबले होते.स्थानिक नागरिकांसह भिवंडी अग्निशामक दलाचे जवान दाखल होत त्यांनी ठीगाऱ्या खालून एकूण सात जणांना बाहेर काढले.त्यापैकी तस्निम कौसर मोमीन वय ८ महिने व उझ्मा अब्दुल लतिफ मोमीन वय ४० वर्षे या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अब्दुल लतिफ मोमीन वय ६५ वर्ष,फरजान लतिफ मोमीन वय ५० वर्ष,बुशरा आतिफ मोमीन वय ३२ वर्ष, अदीमा लतिफ मोमीन वय ७ वर्ष,उरूसा अतिफ मोमीन वय ३ वर्षे हे जखमी झाले आहेत.या सर्व जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.जखमींपैकी अब्दुल लतिफ मोमीन यांची प्रकुर्ती गंभीर असून अदीमा लतिफ मोमीन व उरूसा अतिफ मोमीन या दोघी लहान मुली किरकोळ जखमी आहेत.
घटनास्थळी रात्री उशिरा पालिका आयुक्त अजय वैद्य हे दाखल होत त्यांनी घटनास्थळाची पाहणी करीत रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे.ही इमारत धोकादायक होती कि कसे या बाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल अशी माहिती आयुक्त वैद्य यांनी दिली आहे.