भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 08:19 AM2023-01-27T08:19:57+5:302023-01-27T08:20:41+5:30
या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का? याचा शोध सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
ठाणे : भिवंडीमध्ये खाडीपार येथील मूलचंद कम्पाऊंड परिसरात दोन मजली जुनी इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का? याचा शोध सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील मूलचंद कम्पाऊंड परिसरात आज पहाटेच्या सुमारास दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळल्याने खाली कापडाच्या दुकानात झोपलेल्या एका व्यक्तीचा ढिगाराखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मजीद हबीब अन्सारी (वय 35 वर्षे) असे मयताचे नाव आहे. ही इमारत कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. या ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकले आहे का? याचा तपास सुरु केला आहे. ही दोन मजली इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असून ही कमर्शियल आहे. यामध्ये कापडाचे गोडाऊन तसेच टेक्स्टाईल कंपन्यांचे ऑफिस होते.
दरम्यान, भिवंडीत अनेक धोकादायक इमारती असून अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. परंतु महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग या ठिकाणी वेळीच कारवाई होत नसल्याने अशा घटना घडत आहेत. तसेच, या इमारतीला नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.