नागरिकांच्या विरोधानंतर वळण रस्त्याच्या निर्णयाबाबत यू टर्न
By जितेंद्र कालेकर | Published: July 14, 2023 08:56 PM2023-07-14T20:56:13+5:302023-07-14T20:56:30+5:30
लाल बहाद्दूर शास्त्री मागार्वरील वळण रस्ता केला पूर्ववत: केवळ लहान वाहनांना प्रवेश
ठाणे : वाहतूक शाखेने शहरातील लाल बहादूर शास्त्री मार्गावरील आराधना सिमेनागृहाजवळील रस्त्यावर दुभाजक बसवून बंद केलेला वळण रस्ता लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून विरोध झाल्याने अखेर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी पुन्हा सुरु केला. येथून केवळ लहान वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील अरुंद रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी दुभाजक बसवून मार्गांवरील वळण रस्ते अनेक ठिकाणी बंद केले आहेत. गोखले रोड, तीन पेट्रोल पंप येथील आराधना सिनेमा, एलबीएस रोड येथेही अशाच प्रकारे दुभाजक बसविले आहेत. रस्ते अरूंद असताना त्यावर दुभाजक बसविले जात असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची काेंडी कमी हाेण्याऐवजी ती वाढत असल्याचेही पहायला मिळत आहे.
वळण रस्ता बंद झाल्याने आराधना सिनेमागृह येथून हरिनिवासच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांना तीन पेट्रोल पंप येथून वळसा घालून प्रवास करावा लागत होता. तीन पेट्रोल पंप येथील पेट्रोल पंपावर अनेक वाहन चालक इंधन भरण्यासाठी येत असतात. या वाहनांच्या परिसरात रांगा लागतात. त्यात वळण घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांचा भार येथे वाढला. यामुळे तीन पेट्रोल पंप परिसरात कोंडी होऊ लागली हाेती. त्यामुळे आराधना सिनेमागृहाजवळील वळण रस्ता सुरु करण्याची आग्रही मागणी स्थानिकांनी केली हाेती.
त्यासाठी त्यांनी वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला होता. शुक्रवारी माजी नगरसेवक सुनेश जोशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमले. यावेळी महापालिकेचे कर्मचारी आणि वाहतूक पोलिस अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. नागरिकांची समस्या लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी येथील दुभाजक काढून वळण रस्ता पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. या मार्गावरून केवळ दुचाकी, रिक्षा, माेटार अशा लहान वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. बससारख्या माेठ्या वाहनांना वळण घेण्यास बंदी राहणार असल्याचेही वाहतूक पाेलिसांनी सांगितले.
आराधना येथील नागरिकांच्या तक्रारी असल्यामुळे मध्यम उपाय म्हणून येथील काही दुभाजक हटविण्याचा निर्णय घेतला. मात्र, माेठया वाहनांना बंदी राहणार आहे.- विनयकुमार राठोड, पाेलिस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा