११ वीच्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचे ५० वर्षानंतर अनोखे स्नेहसंमेलन!
By सुरेश लोखंडे | Updated: February 19, 2024 18:19 IST2024-02-19T18:19:41+5:302024-02-19T18:19:53+5:30
विद्यार्थ्यांचे हे ५० वर्षानंतरचे स्नेह संमेलन म्हणजेच एक प्रकारे हा सुवर्ण महोत्सवच होता.

११ वीच्या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचे ५० वर्षानंतर अनोखे स्नेहसंमेलन!
ठाणे : ध. ना. चौधरी बहुउद्देशीय विद्यालयात १९७३-७४च्या बॅचला ११ वीच्या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन अलिकडेच शास्त्री हॉल डोंबिवली पूर्व येथे पार पडले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सोडून पन्नास वर्षे पूर्ण झाली असतानाही या प्रदीर्घकालावधीनंतर त्यांनी एकमेकांचा कसाोशीन शोध घेऊन या ४५ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी तब्बल ५० वर्षानंतर स्नेहसंमेलनाच आनंद मनमुराध घेतला, असे यातील जेष्ठ नागरीक उज्वल जोशी यांनी 'लोकमत'ला सांगितले.
विद्यार्थ्यांचे हे ५० वर्षानंतरचे स्नेह संमेलन म्हणजेच एक प्रकारे हा सुवर्ण महोत्सवच होता. या कार्यक्रमाला साधारण ४५ विद्यार्थी, विद्यार्थिनी लगबगीने शाळेत हजर होत या साेहळ्याचा आनंद धेतला. आमच्याकडे फोन मोबाईल ईमेल फेसबुक अशी कम्युनिकेशनची साधने उपलब्ध नसल्याने मित्र, मैत्रिणी शोधायला खूपच वेळ लागला. शोधाशोध हे कठीण काम असतानाही आम्ही एकमेकांच्या सहाय्याने सर्वांचा शोध घेऊन पार पडलेल्या स्नेह संमेलनात आठवणी जागवल्या.
संमेलनात आलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची नोंद, आपल्या शेजारी बसलेल्यांची ओळख करून देणे, पन्नास वर्षात आलेले सामाजिक आणि नोकरीमध्ये आलेले चांगले अनुभव याची देवाणघेवाण, संगीत खुर्ची रिंग टाकणे, हौझी गाणी दरवाजा पुढील रांगोळी असे कार्यक्रम खेळ यावेळी उत्साहात पार पडले. अपरिहार्य कारणामुळे काही मित्र मैत्रिणी या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांची अनुपस्थिती हजर असलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींना खूपच जाणवली.या वर्षी भेटवस्तू म्हणून शाळेचे नाव, बॅच चे सन व ५० - सुवर्ण वर्षाचा लोगो असलेली सौर समई भेट देण्यात आली.
या अनोख्या स्नेह संमेलासाठी उज्वल जोशी यांनी सांगितले की, शालेय वर्षांमध्ये उपलब्ध असलेल्या वस्तू, तसेच त्यावेळी ज्या वस्तूंमुळे कदाचित शिक्षा भोगावी लागली अशा चणे दाणे , गोट्या, सागर गोटे, चिंच, बोरे लिमलेटची गोळी विविध प्राणी आणि इंग्रजी अक्षरे असलेली बिस्किट्स हा सारा खजिना गोळा करून तो यावेळी भेट देण्याचा एक अनोखा विचार आम्ही केला. त्याला सगळ्यांनीच भक्कम साथ दिली. त्यामुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा शालेय जीवनात गेल्याची आठवण झाली. कुठलेही स्नेहसंमेलन किंवा कार्यक्रम हे एक टीमवर्क असते. त्यामुळे सगळ्यांनीच हा कार्यक्रम यशस्वी व्हायला खारीचा वाटा उचलला. काही ठळक नावे घ्यायची तर दिलीप कर्वे, अनुप आगटे, श्रीकांत दंडगे, डॉ. स्मिता फणसे, अलका फाटक, सुमन देशपांडे आणि उज्वल जोशी यांनी किंचित जास्त मेहेनत घेतल्याचे आढळून आले.