लोकमान्य नगर येथील एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली
By जितेंद्र कालेकर | Published: September 18, 2022 06:58 PM2022-09-18T18:58:33+5:302022-09-18T19:00:46+5:30
लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील शीला यादव यांच्या घराची भिंत जवळच असलेल्या प्रकाश उपडे यांच्या घरावर कोसळल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
ठाणे - लोकमान्य नगर परिसरात एका घराची भिंत लगतच्या दुसऱ्या घरावर कोसळल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत लगतची इतर तीन घरेही धोकादायक स्थितीत झाल्याने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील शीला यादव यांच्या घराची भिंत जवळच असलेल्या प्रकाश उपडे यांच्या घरावर कोसळल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे या घराजवळील सुमन सिंग, शीला जसवार आणि मोहम्मद युनूस यांची तीन घरेही धोकादायक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेतली.
सुदैवाने, या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने धोकादायक झालेल्या घरांना धोक्याचा इशारा देणारी धोकापट्टी बांधली आहे. या घटनेत बाधीत झालेली घरे रिकामी केली असून रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव स्वेछेने त्यांच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केले आहे.