जर्मन पती सोबत महिलेने दुचाकी वरून १५५ दिवसांचा प्रवास करत गाठले भाईंदर
By धीरज परब | Published: November 27, 2022 09:27 PM2022-11-27T21:27:26+5:302022-11-27T21:27:34+5:30
विशेष म्हणजे एकूण प्रवासात पाकिस्तान मध्ये त्यांना लोकां कडून जास्त आपुलकी आणि प्रेम मिळाल्याचे तिने सांगितले .
मीरारोड - भाईंदरच्या नवविवाहित तरुणीने जर्मन पती सोबत सासर वरून दुचाकीने १९ देश व १५५ दिवसांचा प्रवास करत भारताच्या भाईंदर मधील माहेर गाठले . विशेष म्हणजे एकूण प्रवासात पाकिस्तान मध्ये त्यांना लोकां कडून जास्त आपुलकी आणि प्रेम मिळाल्याचे तिने सांगितले .
भाईंदरच्या जेसलपार्क भागातील रविराज कॉम्प्लेक्स मध्ये लहानाची मोठी झालेली मेधा राय हि गेल्या ७ वर्षां पासून जर्मनी मध्ये राहते. शिक्षण पूर्ण केल्या नंतर तिकडेच ती नोकरीला आहे . मार्च मध्ये तिने तिचा मित्र हॉक याच्याशी जर्मनी मध्येच न्यायालय पद्धतीने लग्न केले . कोविड मुळे तिचे आई - वडील आदी मुलीच्या लग्नात उपस्थित राहू शकले नाहीत .
भारतात आपल्या घरी जाण्यासाठी मेधा व पतीने दुचाकी वरून जाण्याचा निर्णय घेतला . ती सुद्धा चांगली बायकर असल्याने दोन दुचाकी वरून दोघांनी जर्मनीच्या घरातून आपला भारत प्रवास सुरु केला . १९ देशांचा प्रवास करत १५५ दिवसांनी म्हणजेच २६ नोव्हेम्बर रोजी दोघे भाईंदर मध्ये दाखल झाले. सुमारे २४ हजार किमी चा प्रवास दुचाकी वरून केला . जेसलपार्क येथे पोहचल्यावर तिच्या कुटुंबियांसह रहिवाश्यांनी मेधा व जर्मन जावयाचे उत्स्फूर्त स्वागत केले .
मेधा हिने तिचा प्रवासाचा अनुभव सांगताना सर्वात जास्त प्रेमळ स्वागत पाकिस्तान मध्ये झाल्याचे ती म्हणाली . पाकिस्तान मध्ये पोहचल्यावर तेथील पोलिसांनी काही असुरक्षित भागात संरक्षण देत सुरक्षित ठिकाणी सोडले . मी भारतीय आहे कळल्यावर पाकिस्तान मध्ये तर लोकं खुश झाल्याचे दिसले . तेथील नागरिकांनी तीन वेळा आम्हाला चहा प्यायला घरी बोलावले. नाहीतर भारतात जाऊन सांगाल कि पाकिस्तान मध्ये चहा सुद्धा पाजला नाही अशी तेथील नागरिकांची आठवण मेधाने आवर्जून सांगितली .
वाघा बॉर्डर ओलांडून दोघे भारतात आले . १९ देशांचा दुचाकी वरून प्रवास करताना प्रत्येक ठिकाणी लोकं खूप चांगले असतात व त्यांना प्रत्येकाला मदत करायची असते असा अनुभव तिने सांगितला . काही ठिकाणी भाषेत अडचण आली . इराण मध्ये सैल कपडे घालावे व चेहरा कपड्याने झाकण्यास सांगण्यात आले . मात्र तेथील लोकं सुद्धा चांगले सहकार्य करणारे होते असे मेधा म्हणाली .