ठाण्यात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिला दलालास अटक , ३० हजारांमध्ये केला महिलेचा सौदा
By जितेंद्र कालेकर | Published: January 13, 2023 06:47 PM2023-01-13T18:47:22+5:302023-01-13T18:47:58+5:30
गरिब, गरजू महिला तसेच तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना शरीर विक्रयाच्या व्यवसायात ओढणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली.
ठाणे: गरिब, गरजू महिला तसेच तरुणींना पैशाचे अमिष दाखवून त्यांना शरीर विक्रयाच्या व्यवसायात ओढणाऱ्या एका दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अटक केली. तिच्या तावडीतून दोन पिडित महिलांची सुटका केल्याची माहिती गुन्हे शाखेने शुक्रवारी दिली.
ठाण्यातील घोडबंदर रोड भागातील लॅरिडा हॉटेल परिसरात एक २८ वर्षीय दलाल महिला काही तरुणींकडून शरिर विक्रयाचा व्यवसाय करुन घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याचआधारे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, जमादार श्रद्धा कदम, एस. व्ही. सोननीस, डी. व्ही. चव्हाण, भोसले, डी. के. वालगुडे, हवालदार पी. ए. दिवाळे आणि अंमलदार आर. व्ही. कदम आदींच्या पथकाने १२ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड भागात सापळा लावला. त्यावेळी पोलिसांनी एका बनावट गिºहाईकाच्या माध्यमातून यातील दलाल महिलेला गाठले.
मुंबईतील अंधेरी भागातून आलेल्या या दलाल महिलेने ३० हजारांमध्ये एका महिलेचा सौदा केला. त्यासाठी ती सोबत दोन महिलांना घेऊन आली होती. तिला ही रक्कम दिल्यानंतर तिने त्यातील पाच हजार रुपये दोन्हींपैकी एका महिलेला तर २५ हजारांची रक्कम स्वत:कडे ठेवली. या बनावट गिºहाईकाने या सर्व प्रकाराबाबतचा इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी धाड टाकून दलाल महिलेला ताब्यात घेतले. तिच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिला राबोडी पोलिसांच्या ताब्यात दिले असून तिच्या तावडीतून २५ ते २८ वर्षीय दोन महिलांची सुटका केली आहे. त्यांची सुधारगृहात रवानगी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर हे करीत आहेत.