सिझेरियन झालेल्या महिलेचा मनोरमध्ये मृत्यूू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 08:46 AM2023-02-03T08:46:18+5:302023-02-03T08:47:38+5:30
Death: मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात एका महिलेचे प्रसूतीदरम्यान सिझेरियन झाले. तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर दोन दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मनोर : मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात एका महिलेचे प्रसूतीदरम्यान सिझेरियन झाले. तिने एका बाळाला जन्म दिल्यानंतर दोन दिवसांतच तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मनोर परिसरातील नांदगाव येथील सुनीता बारकू कोरडा या महिलेची नैसर्गिक प्रसूती न झाल्याने ३१ जानेवारीला मनोर ग्रामीण रुग्णालयात तिचे सिझेरियन झाले होते. मात्र, गुरुवारी सकाळी ही महिला स्वच्छतागृहासाठी गेली असता अचानक तिला चक्कर आली. तिला तिच्या आई आणि बहिणींनी पकडून बेडवर झोपवले. तिची अवस्था पाहून तिच्या नातेवाईकांनी तातडीने डॉक्टरांना बोलावले, मात्र यादरम्यान डॉक्टरांनी उपचार करीत असताना प्रकृती अतिगंभीर होऊन या महिलेचे निधन झाले. तिला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.\
या महिलेला प्रसूतीदरम्यान दोन बाटल्या रक्त चढविण्यात आले होते, मात्र ती शरीराने अशक्त होती. तिला रक्तस्त्रावही जास्त झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, अद्याप तिच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतरच तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.