google वर कस्टमर केअर क्रमांक शोधायला गेलेल्या महिलेचे ३१ लाखां पैकी १० लाख मिळाले परत
By धीरज परब | Published: March 1, 2024 08:05 PM2024-03-01T20:05:41+5:302024-03-01T20:07:32+5:30
माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बँक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले.
मीरारोड - गुगलवर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असतांना सायबर लुटारूंनी ऍनी डेस्क हे थर्डपार्टी स्टाफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगुन महिलेची ३१ लाख रुपयांना फसवणूक केली होती . त्या पैकी ९ लाख ९० हजार रुपये काशीमीरा पोलिसांनी महिलेस परत मिळवून दिले आहेत.
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या माया चक्रवर्ती ह्या गुगल वर ओला चा कस्टमर केअर सर्च करत होत्या . गुगल वर अनेक बनावट कस्टमर केअर सायबर लुटारूंनी अपलोड केलेले असून चक्रवर्ती यांनी कस्टमर केअर चा नंबर म्हणून कॉल कला.
त्यांना समोरच्या अनोळखी व्यक्तीने ओला नावाने बीकेएफ ऍप पाठवले व ते डाउनलोड करून घेण्यास सांगितले . माया यांनी ते डाउनलोड करून घेतल्यावर सायबर लुटारूंनी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून माया यांची तब्बल ३१ लाख ४० हजार ५०० रुपयांना फसवणूक केली होती .
या प्रकरणी गेल्यावर्षी काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे , निरीक्षक राहुल सोनावणे , उपनिरीक्षक वैभव धनावडे सह दिनेश आहेर यांनी तपास करत व्यवहाराची माहिती घेतली. माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळया बँक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले.
त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये उपलब्ध रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरीता पोलिसांनी पाठपुरावा करत फसवणूक झालेल्या माया चक्रवर्ती यांच्या खात्यात ३१ लाखां पैकी ९ लाख ९० हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे .