लेखक सगळ्यात जास्त लिहायलाच घाबरतो - गीतकार स्वानंद किरकिरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 11:59 AM2024-03-03T11:59:05+5:302024-03-03T11:59:38+5:30
"भगतसिंग, गांधी यांचे विचार पुन्हा पुन्हा मांडावेच लागतील"
ठाणे : लेखक सगळ्यात जास्त घाबरतो ते लिहायला. त्याचे सगळ्यात शेवटचे काम म्हणून तो लिखाण करतो. त्याच्याआधी तो लिखाणापासून जितका पळायचा प्रयत्न करता येईल, तितका करतो आणि जेव्हा अगदीच गळ्याशी येते की, आता सांगितल्याशिवाय राहणार नाही, अशी वेळ येते तेव्हाच तो लेखनातून व्यक्त होतो, अशी लेखनप्रक्रियेची अनुभूती ख्यातनाम गीतकार स्वानंद किरकिरे यांनी उलगडली. लोकमतसाहित्य पुरस्कार सोहळ्यात अपर्णा पाडगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
गाणे, संगीत, नाटक, चित्रपट यातील आजवरचा प्रवास कसा समृद्ध होत गेला, हे किरकिरे यांनी यावेळी विविध किश्श्यांमधून सांगितले. त्याचवेळी बावरा मनचे सूर छेडत त्यांनी रसिकांच्या काळजाचा ठावही घेतला. भगतसिंग यांच्याविषयीचे प्रेम सांगताना त्यांनी सध्याच्या काळात भगतसिंग आणि गांधीजी यांच्यावर पुनःपुन्हा बोलावेच लागेल, त्यांचे विचार पुन्हा पुन्हा मांडावेच लागतील, अशी परखड भूमिकाही मांडली. किरकिरे म्हणाले, लिखाण करणे सोपे नाही. कुठून तरी आतून आल्याशिवाय लेखक लिहायला बसत नाही. त्यामुळेच लेखक सगळ्यात जास्त घाबरतो लिहायला, असे माझे मत आहे. या जगात एकच दुवा आहे, ज्याने आपल्याला जोडून ठेवलेले आहे आणि ते आहे प्रेम... बाकी काहीही नाही. जीवनावर, लोकांवर प्रेम करणे याच्या व्यतिरिक्त आणखी काहीही काम नसू शकते. काही तरी करा आणि नका भांडू रे, असे आर्जव करताना ते म्हणाले की, किती भेद आहेत, तरी त्यांना एकत्र बांधू शकेल, अशी एकमेव कला आहे. म्हणून कलेची जागा आपल्या जगण्यात आहे.
'ते' नाटक आता केले तर...
एनएसडीमधून पास आउट झालो तेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे पन्नासावे वर्ष होते. त्यावेळी मी भगतसिंगांवर नाटक करणार होतो. त्या नाटकाचे नाव मी एक सपना असे ठेवले होते.
आज जर मी ते केले, तर मला जोड्यानेच मारतील. कारण त्याची सुरुवात अशी होती की, भारतमाता कॅटवॉक करतेय... आम्ही सरकारच्या पैशाने सरकारच्या विरोधात बोलू शकत होतो, असा तो काळ होता. आता तशी स्थिती नाही.
तो मेड इन इंडियाचा, जागतिकीकरणाचा नवा काळ होता. सगळ्याच गोष्टी मॉडर्न करून टाकल्या होत्या. टीव्ही नावाची वस्तू आली होती, त्यातून सरकारविषयी फक्त चांगलेच बोलले जात होते. खरे काही कुणी बोलतच नव्हते. त्यातून त्या नाटकाची मांडणी केली होती.
कुणी ना कुणी हीरो आपले करून घेण्याचा हा काळ
भगतसिंग हेच प्रेम आहे, हे सांगताना किरकिरे म्हणाले की, भगतसिंग याच्या मृत्यूनंतर सगळ्या विचारसरणी त्याला आपल्याकडे खेचत होत्या. उजवे आणि डावे दोघेही भगतसिंग आमचाच असे म्हणत होते आणि सगळ्या लोकांना कुणी ना कुणी हीरो आपले करून घ्यायचे असतात. आपल्या काळात आपण हे पाहतोच आहोत. कुठलाही हीरो असो, तो आपला करून घ्यायचा, त्याच्याबद्दल आपण बोलायला लागायचे, अगदी तसे भगतसिंगबाबत झाले.
किरकिरे यांनी भगतसिंग यांचे शेर सादर केले -
उसे ये फिक्र है की हरदम नया तर्जे दफा क्या है
हमे ये शौक है की इस सितम की इम्तिहां क्या है
जहर से क्यूं खफा रहे, चर्ख का क्यूं गिला करे
सारा जहाँ उदू सही आओ मुकाबला करे
हवा मे रहेगी मेरे खयाल की खुशबू
यू इश्तेफाक है पानी रहे रहे ना रहे...
हवेत माझे विचार राहतील, हे शरीर राहिले नाही राहिले तरी काय? असे विचार मांडणारा भगतसिंग मला खूप वर्षे आयुष्यात पुरून उरला, असे सांगून किरकिरे म्हणाले की, मला पुन्हा भगतसिंग करायला खूप आवडेल. भगतसिंगवर, गांधींवर पुन्हा पुन्हा बोलावेच लागेल. कारण, ती काळाची गरज आहे.