ठाण्यातील तरुणाचे खंडणीकरिता थायलंडमध्ये अपहरण, परदेशात नोकरीचे दाखवले आमिष
By जितेंद्र कालेकर | Published: October 18, 2022 08:09 PM2022-10-18T20:09:43+5:302022-10-18T20:09:49+5:30
अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्याची केली जाते सक्ती
ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील आशिष दुबे या उच्चशिक्षित तरुणाचे थायलंडमध्ये तीन हजार डॉलरच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे. त्याची थायलंडच्या दूतावासाशी बोलून सुटका करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आशिषच्या पालकांनी केली. दरम्यान, ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला असून ठाणे खंडणी विरोधी पथकाने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आशिषचा भाऊ अविनाश दुबे याने दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. आशिष हा २० सप्टेंबरला एका मित्राच्या ओळखीतून थायलंडमध्ये डिजिटल मार्केटिंग या फिल्डमध्ये नोकरीसाठी गेला होता. तिथे चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. आशिषने सर्व प्रक्रिया पूर्ण करून थायलंडमधील संबंधित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तिथे गेल्यानंतर मात्र त्याला वेगळाच प्रकार अनुभवायला मिळाला. त्याला जंगलातून नदी ओलांडून एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यासारख्याच भारतातील १३ तरुणांना ठेवण्यात आले होते.
सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात ट्रेनिंग दिल्यानंतर बनावट ई-मेल आयडी तेही मुलींच्या नावाने तयार करुन अमेरिकन नागरिकांना क्रिप्टो करन्सी विकण्याच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे काम आशिषला देण्यात आले होते. त्याच्यासह अन्य काही मुलांनी या कामाला नकार दिला. तेव्हा त्याला धमकावण्यात आले. आशिषसह अन्य काही तरुणांनी राजीनामा दिल्यानंतर ५० थायबाथ तिकीट खर्च आणि तीन हजार डॉलर अन्य शुल्काच्या नावाखाली साडेचार लाखांच्या खंडणीची मागणी या कंपनीचा मिसम हुसेन या एचआर प्रतिनिधीने केली. ती दिली तरच आशिषला सोडण्यात येईल, असे त्याने धमकावले.
दिवसातून एकदाच शिळे जेवण, १८ तासांचे काम असून चायनीज लोकांच्या सुरक्षिततेमध्ये त्यांना ठेवण्यात येते, अशा सर्व त्रासाची माहिती दुबे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री शिंदे तसेच पंतप्रधान मोदी यांना ईमेलद्वारे दिली. भारतीय आणि थायलंडच्या दूतावासाकडून दुबे कुटुंबीयांना प्रतिसाद मिळालेला नाही. या संपूर्ण रॅकेटमध्ये भारतातीलही काही लोकांचा समावेश असल्याचे आशिषने फोनद्वारे आपल्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणल्याचे अविनाशने सांगितले.
त्याच्यासोबतच्या अन्य एका मुलाने पाच लाखांची रक्कम थायलंडच्या या टोळीला दिली. तरीही त्याला न सोडल्याने आशिष पूर्णपणे हादरला आहे. या संपूर्ण प्रकरणात राज्य आणि केंद्र सरकारने लक्ष देऊन आशिषसह त्याच्या साथीदारांची थायलंडच्या दूतावासाच्या मदतीने सुटका करावी, अशी मागणी दुबे कुटुंबीयांनी केली. दरम्यान, १२ आॅक्टोबर रोजी फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून १७ आॅक्टोबर रोजी हे प्रकरण ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तपासासाठी आले असून दोघांची चौकशी केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले.