अवघ्या ३०० रुपयांसाठी कळव्यात युवकाला विवस्त्र करीत बेदम मारहाण; एकाला अटक दुसरा पसार
By जितेंद्र कालेकर | Published: November 22, 2023 07:28 PM2023-11-22T19:28:02+5:302023-11-22T19:28:13+5:30
हातउसने घेतलेल्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडला.
ठाणे : उसने घेतलेले तीनशे रुपये परत देण्यासाठी तसेच घरातील ब्लूटूथ हेडफोन घेउन गेल्याच्या कारणाने एका १७ वर्षीय मुलाला कपडे काढून गंभीर मारहाण करीत कळव्यातील बाजारपेठेत फिरवल्याचा धक्कादायक प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे उघड झाला आहे. यात एकाने मारहाण केली तर दुसऱ्याने त्याचा व्हिडीओ बनवला. याप्रकरणी जखमी युवकाने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तौसिफ खानबंदे याला अटक केली असून त्याचा मित्र सामिल खानबंदे हा पसार असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली. कळवा येथे राहणारा जखमी युवक ज्या सोसायटीत राहतो.
तेथे २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तौसिफ आणि त्याचा मित्र सामील खानबंदे हे दोघे आले. त्यावेळी तौसिफ याने जखमी मुलाला तू माझ्या घरी येवुन ब्लुटुथ हेडफोन घेवुन का गेलास, अशी विचारणा करीत शिवीगाळी केली. याचदरम्यान तौसिफ याने पिडित मुलाने घेतलेले हातउसणे तीनशे रुपयांचीही मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. याचाच राग मनात धरून तौसिफ याने अनकुचीदार हत्याराने या पिडित मुलाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली हल्ला केला. मला आताच पैसे पाहिजेत नाहीतर तुला सोडणार नाही, अशीही दमबाजी त्याने केली. तसेच त्याचा मित्र सामिल यानेही पिडित मुलाला हाताच्या चापटीने मारहाण केली. त्यानंतर तौसिफ याने युवकाच्या पॅन्टचा बेल्ट काढून त्याच बेल्टने त्याच्या पाठीवर मारहाण केली. याचदरम्यान त्या दोघांनी मिळून त्या मुलाचा शर्ट काढला. येवढ्यावर ते थांबले नाहीतर तौसिफ याने युवकाची पॅन्ट देखील उतरवली. त्यानंतर त्यांनी मारहाण करीत त्याला बाजारपेठेत फिरवले. या मारहाणीचा व्हिडीओ सामील याने बनवला. त्यानंतर यातील जखमी युवकाने झालेला प्रकार कळवा पोलिसांना सांगितल्यावर याप्रकरणी बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल केला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या तौसिफ याला सकाळी राहत्या घरातून अटक केली. मात्र त्याचा मित्र पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हातउसने घेतलेल्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडला. यामध्ये अल्पवयीन युवकाला मारहाण करण्यात आली आहे. तर त्या मारहाणीचा व्हिडिओही शूट करण्यात आला. मारहाण आणि व्हिडिओ बनवणारे अल्पवयीन नाहीत. याप्रकरणी गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. - कन्हैया थोरात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे.