भिवंडीत मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By नितीन पंडित | Published: February 21, 2024 05:57 PM2024-02-21T17:57:21+5:302024-02-21T17:57:51+5:30

१४ फेब्रुवारी रोजी शहरातील बी एन एन महाविद्यालया बाहेर देवा कैलास धोत्रे यास संकेत भोसले व त्यासोबत असलेल्या काही युवकांचा धक्का लागला असता त्यातून त्यांच्या मध्ये बाचाबाची झाली होती.

A youth who was seriously injured in an assault in Bhiwandi died during treatment | भिवंडीत मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

भिवंडीत मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

भिवंडी: महाविद्यालयाच्या बाहेर धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीच्या घटनेत युवकांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास जबर मारहाण केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी घडली होती.जखमी युवकाची परिस्थिती गंभीर असल्याने त्यावर मुंबई येथे उपचारा दरम्यान त्याचा बुधवारी दुर्दैवी अंत झाला आहे.या मृत्यूची वार्ता कळताच धामणकर नाका ते वऱ्हाळा देवी रोड कामतघर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मारहाण करणारे सर्व आरोपींना पोलिस जोपर्यंत अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केले आहे.संकेत सुनील भोसले वय १६ वर्ष असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी अल्पवयीन युवकाचे नाव आहे.

१४ फेब्रुवारी रोजी शहरातील बी एन एन महाविद्यालया बाहेर देवा कैलास धोत्रे यास संकेत भोसले व त्यासोबत असलेल्या काही युवकांचा धक्का लागला असता त्यातून त्यांच्या मध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर देवा धोत्रे याने आपले वडील शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख कैलास धोत्रे यांना ही माहिती दिली असता ते आपल्या सोबत आठ दहा जणांना घेऊन येत त्याठिकाणी युवकास मारहाण केली. त्यामध्ये कैलास धोत्रे व त्याच्या सोबत आलेल्या गुंडांनी संकेत भोसले याचे अपहरण करून घेऊन गेले व आपल्या हद्दीत नेऊन त्यास बेदम मारहाण केली.त्यामध्ये जबर जखमी झाल्याने त्यास उपचार करीता मुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता सात दिवसांनंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिवसेना शिंदे गटाच्या उपशहर प्रमुखास पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप

संकेत राहत असलेल्या वऱ्हाळ देवी नगर परिसरात शोककळा पसरली असून संतप्त नागरिकांनी धामणकर नाका ते कामतघर रोड व अंजुरफाटा या रस्त्यावरील दुकाने वाहतूक बंद पाडून आपला संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी देवा धोत्रे यास किरकोळ मारहाण झाली असताना संकेत व त्याचा मित्र विवेक डोळस यांच्या विरोधात गंभीर गुन्हा नोंदवला पण संकेतला अपहरण करून ठार करणाऱ्यांना पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप आर पी आय आठवले गटाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केला असून शिवसेना शिंदे गटाचा वरदहस्त असल्याने त्यांच्यावर पोलिस कोणतीही कारवाई करीत नसून आरोपी सात दिवसांपासून मोकाट असल्याने जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा महेंद्र गायकवाड यांनी दिला आहे. तर या दुर्दैवी घटनेनंतर धामणकर नाका परिसरात दुकाने रिक्षा बंद करण्यात आल्या असून अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत.नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Web Title: A youth who was seriously injured in an assault in Bhiwandi died during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.