‘ए... लाव रे तो व्हिडीओ’ ठाण्यात नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:12 AM2019-04-20T00:12:47+5:302019-04-20T00:14:21+5:30

महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांत सध्या ‘ए... लाव रे तो व्हिडीओ’, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश घुमत आहे.

'Aaaaaaaaaaaaa wa video video' is not there? | ‘ए... लाव रे तो व्हिडीओ’ ठाण्यात नाही?

‘ए... लाव रे तो व्हिडीओ’ ठाण्यात नाही?

ठाणे : महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांत सध्या ‘ए... लाव रे तो व्हिडीओ’, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश घुमत असून त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वक्तव्याचे व सरकारमधील उणिवांचे व्हिडीओ प्रदर्शित केले जात आहेत. मात्र, ठाणे लोकसभा मतदारसंघात राज यांचा तोच आदेश घुमण्याची शक्यता कमी असल्याचे मनसेच्या उच्चपदस्थ नेत्यांनी सांगितले. अर्थात, मनसेचे स्थानिक नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते राज यांनी ठाण्यात सभा घ्यावी, याकरिता प्रयत्नशील आहेत. परंतु, ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादीचे उमेदवार तुलनेने कमकुवत वाटत असल्याने राज उत्सुक नसल्याची चर्चा आहे. कारण, निवडणूक निकालानंतर राज यांनी जेथेजेथे सभा घेतल्या, तेथेतेथे निकाल कुणाच्या बाजूने लागले, याची चर्चा होणे स्वाभाविक असल्याने जेथे हमखास विरोधी उमेदवारांची विजयाची शक्यता आहे, तेथे पायधूळ झाडण्याचा चाणाक्षपणा राज यांनी दाखवल्याचे बोलले जाते.
लोकसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार रिंगणात नाही. मात्र, केवळ नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीला राजकीय क्षितिजावरून दूर करा, हा संदेश देण्याकरिता राज यांच्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा झाल्या. पार्थ पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, अशा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर व पुन्हा विजयी होण्याची दाट शक्यता असलेल्या उमेदवारांकरिता राज यांनी सभा घेतल्या आहेत. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे संघटन मजबूत आहे. तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना ऐनवेळी गणेश नाईक यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यावर रिंगणात उतरवले आहे.


कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हेही नवखे असून ते ठाणे महापालिकेतील नगरसेवक आहेत. राज ठाकरे यांनी सभा घेताना आपल्या भाषणाचा आजूबाजूच्या किमान दोन ते तीन मतदारसंघांवर प्रभाव पडेल, असा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज हे मुंबईत एकच सभा घेतील, अशी शक्यता आहे. राज यांनी ठाणे व पनवेल येथे जाहीर सभा घ्यावी, याकरिता मनसेचे स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही मुंबई, ठाण्यातील उमेदवारांकरिता एकच सभा घेणार आहेत. त्यामुळे आपणही केवळ मुंबईतच एक सभा घेऊ, असा विचार राज करतील, असे समजते. राज यांच्या पुढील सभांची यादी येत्या एकदोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, ठाणे हे त्यामध्ये नसेल, असे संकेत एका उच्चपदस्थ नेत्याने दिले. अर्थात, स्थानिक नेत्यांनी अजून आशा सोडलेली नाही. सभा घ्यावी, याकरिता ते राज यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
>राष्ट्रवादीचे नेते राज यांनी ठाण्यात सभा घ्यावी, याकरिता प्रयत्नशील आहेत; परंतु ठाणे व कल्याणमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार तुलनेने कमकुवत वाटत असल्याने राज उत्सुक नसल्याची चर्चा आहे.

Web Title: 'Aaaaaaaaaaaaa wa video video' is not there?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.