अबब... घोडबंदर भागात खचला तब्बल ५ किमी रस्ता, दुरुस्तीचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:16 PM2019-07-01T18:16:49+5:302019-07-01T18:20:00+5:30
मुसळधार बरसणाऱ्या पावसाने महापालिकेची पोलखोल केली आहे. घोडबंदर भागातील तब्बल ५ किमीचा नवीन रस्ता खचला असल्याची बाब समोर आली आहे. परंतु ठेकेदावर कोणतीही कारवाई न करता उलट त्यावर पांघरुन घालण्याचे काम पालिकेने केले आहे.
ठाणे - मागील काही दिवसापासून ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परंतु या पावसाने ठाणे महापालिकेची पोलखोलसुध्दा केल्याची बाब समोर आली आहे. घोडबंदर भागात तब्बल ५ किमी पर्यंतचा नवीन रस्ताच या पावसात खचल्याची बाब समोर आली आहे. आता युध्द पातळीवर या रस्त्याची दुरुस्ती सुरु झाली असून त्यावर तात्पुरती मलमपट्टी लावण्याचे काम पालिकेने ठेकेदाराच्या माध्यमातून सुरु केले आहे.
पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेने शहरातील सर्वच रस्ते चकाचक केले होते. त्यामुळे पावसाळ्यात ठाणेकरांचा प्रवास हा सुखकर शिवाय खड्डेविरहित रस्त्यावरुन होईल अशी अपेक्षा वाटत होती. परंतु आता ही अपेक्षा काही अंशी खोटी ठरू लागली आहे. शहरातील वागळे इस्टेट, कळव्यातील काही भाग, माजिवडा, कापुरबावडी, सेवा रस्ते आदी रस्त्यांवरसुध्दा खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे.
पावसाळ्यापूर्वी घोडबंदर भागातील मलनिसारण वाहिन्या टाकण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात आले होते. या भागात तब्बल ३० किमी पर्यंत मलनिसारण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्यांचे डांबरीकरणही करण्यात आले होते. परंतु आता या ३० किमी पैकी तब्बल ५ किमी पर्यंतचा रस्ता प्रचंड प्रमाणात खचल्याची बाब समोर आली आहे. घोडबंदर भागातील कावेसार, न्यु हॉराईजन स्कुल, आनंद नगर रोड ते ऋतु इनक्लेव्ह, हॉली फॅमीली स्कुल आदी भागातील रस्ता खचला आहे. तुर्तास या रस्त्यावरील वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली असून येथील वाहतुक दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली आहे. सुदैवाने हा आतील भागातील रस्ता असल्याने, या भागात वाहनांची वर्दळ कमी प्रमाणात दिसून येत आहे. परंतु नव्यानेच तयार करण्यात आलेला हा रस्ता खचला कसा असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच यात दोषी कोण असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या प्रकरणात संबधीत ठेकेदार हाच जबाबदार असल्याचे पालिका सांगत असली तरी त्याच्यावर कारवाई करण्यास तयार नाही. उलट आता त्याच्याकडून या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम त्याच्याकडून सुरु असून त्याची पाहणी पालिकेकडून सुरु आहे. सध्या डब्ल्युव्हीएम पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात या रस्त्यावर मुलामा टाकला जात असून पावसाने उसंत घेतल्यानंतर हा रस्ता पक्का केला जाईल अशी माहिती नगरअभियंता रविंद्र खडताळे यांनी दिली आहे. शिवाय या सर्वाचा खर्च हा संबधींत ठेकेदाराकडूनच करुन घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.