उल्हासनगरात तृतीयपंथीसाठी आधारकार्ड शिबीर; तहसिलदार कोमल ठाकूर यांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 05:19 PM2021-12-15T17:19:02+5:302021-12-15T17:19:13+5:30
उल्हासनगरात वर्षांनुवर्षे राहत असलेले ३५० पेक्षा जास्त तृतीयपंथीयाकडे आधारकार्डसह अन्य कागदपत्रे नसल्याने, ते मतदाना पासून वंचित होते.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : तृतीयपंथीयांना मतदाना पासून वंचित राहू नये यासाठी तहसील व महापालिका कार्यालयाच्या वतीने आधारकार्ड शिबिराचे आयोजन मंगळवारी नेताजी गार्डन मध्ये करण्यात आले. यावेळी तहसिलदार कोमल ठाकूर यांनी मार्गदर्शन केले असून यावेळी ७५ तृतीयपंथीयांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले.
उल्हासनगरात वर्षांनुवर्षे राहत असलेले ३५० पेक्षा जास्त तृतीयपंथीयाकडे आधारकार्डसह अन्य कागदपत्रे नसल्याने, ते मतदाना पासून वंचित होते. त्यांना मतदान करता यावे म्हणून नेताजी गार्डन मध्ये तहसील व महापालिका कार्यालयाच्या वतीने आधारकार्ड शिबिराचे आयोजन केले. तहसीलदार कोमल ठाकूर, महापालिका उपायुक्त प्रियंका ठाकूर, सुभाष ठाकरे, निवासी नायब तहसीलदार अमित बनसोडे, तहसील सेतू केंद्राचे चालक राजेंद्र सानप, समन्वयक सहदेव सूर्यवंशी आदीजन उपस्थित होते. यावेळी तहसिलदार कोमल ठाकूर यांनी मार्गदर्शन करून शहरातील तृतीयपंथीयांना आधारकार्डसह अन्य आवश्यक दाखले देण्यात येणार असल्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले. तर महापालिकेच्या वतीने सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपयुक्त प्रियंका ठाकूर यांनी दिली आहे.