आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे; आदिवासी तरुण बनला पोलीस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 12:21 AM2019-03-12T00:21:14+5:302019-03-12T07:07:43+5:30
नोकरी करत जिद्दीने पूर्ण केले शिक्षण
मुरबाड: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत (पीएसआय) मुरबाड तालुक्यातील चाफेवाडी या आदिवासीवस्तीतील जयवंत रामा वारा यांनी एसटी प्रवर्गात घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल तालुक्यातील आदिवासीबांधवांसह सर्वांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या जयवंत वारा यांच्याकडे अठराविश्वे दारिद्र्य. वडील गावात शेती करण्यासोबतच मोलमजुरी करुन मिळालेल्या पैशांतून कुटुंब चालवत असत. मुलांना शिकवण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने जयवंत यांना त्यांच्या वडिलांनी पहिलीपासून सासणे (कान्होळ) येथील शासकीय आश्रमशाळेत दाखल केले. तेथे त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, माध्यमिक शिक्षण शासकीय आश्रमशाळा, खुटल (बारागाव) येथे, तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आदिवासी वसतिगृहात राहून पूर्ण केले.
आईवडील निरक्षर, तसेच घरची हलाखीची परिस्थिती यामुळे जयवंत यांनी गावाजवळच असलेल्या फार्महाउसवर मजुरी करण्यास सुरुवात केली. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्यांनी कुटुंबास हातभार लावण्यास सुरुवात केली. तसेच स्वत:चे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले.
पदवी घेतल्यानंतर काही दिवसांत त्यांनी मुंबई महानगरपालिकेत सुरक्षारक्षकाची नोकरी मिळवली. ही नोकरी करताकरताच त्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती झाली आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या काही गुणांनी त्यांना यशाने हुलकावणी दिली. मात्र, त्यांनी जिद्द सोडली नाही.
नोकरी सांभाळत पुन्हा त्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला.
जुलै २०१८ मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला.
या परीक्षेत अनुसूचित जमातीच्या पुरु ष गटात चोेविसावा क्रमांक मिळवत त्यांनी घवघवीत यश संपादन केले.
आदिवासी तरु णांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.
तसेच मेहनत करून समाजात नवा आदर्श निर्माण करावा.
आपल्या मदतीला कोणी येईल, यासाठी न थांबता स्वत:च स्वत:चे भविष्य घडवून इतरांसमोर आदर्श निर्माण करावा असे जयवंत वारा यांनी लोकमतला सांगितले.