देश सोडून जाण्यावरून आमिरवर टीका
By admin | Published: November 25, 2015 01:41 AM2015-11-25T01:41:41+5:302015-11-25T01:41:41+5:30
आमिर खान याने देशात असहिष्णुता वाढल्याने देश सोडून जाण्याची भाषा केल्यामुळे त्याच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. सरकारी जाहिरातीतून लोकांना अतुल्य भारताची ओळख करून
ठाणे : आमिर खान याने देशात असहिष्णुता वाढल्याने देश सोडून जाण्याची भाषा केल्यामुळे त्याच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे. सरकारी जाहिरातीतून लोकांना अतुल्य भारताची ओळख करून देणाऱ्या आमिरला अचानक हा देश असहिष्णु कसा वाटू लागला व देश सोडून जाण्यासारखी टोकाची भाषा तो का करु लागला, असा येथील काही कलाकार व त्याचे चाहते करु लागले आहेत. फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅपवर त्याला लक्ष्य केले गेले आहे.
देशात असहिष्णुता माजली आहे. त्यामुळे माझी पत्नी किरण हिला मुलांना कसे सुरक्षित ठेवायचे याचीही भीती वाटत आहे ही आमिरने व्यक्त केलेली भीती शुद्ध वेडेपणा असल्याचे अभिनेता मोहन जोशी यांनी सांगितले.
आमिर खानला जर भारतात भीती वाटते तर ज्या देशात सुरक्षित वाटते त्या देशात आजच्या आज रात्रीचे तिकीट काढावे आणि चालू पडावे. तो गेल्याने हिंदी चित्रपट सृष्टीला काहीही फरक पडणार नाही. असे कित्येक लोक येतात आणि जातात. भारताची लोकसंख्या करोडोंची आहे या सर्व लोकांना भीती वाटत नाही तर मर्सिडीज गाडीतून फिरणाऱ्या आमिर व शाहरूखला कशाची भीती वाटते असा सवाल अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला.
देशात असहिष्णुता माजली असताना सरकार मात्र त्याकडे लक्ष देत नाही. त्याचे पडसाद म्हणून असह्यतेतून लेखकांनी पुरस्कार परत केले आहेत. हे प्रत्येकाचे वैयक्तीक मत आहे. आमिर खानला पुरस्कार परत करणे योग्य वाटते . हे त्याचे वैयक्तीक मत आहे, असे म्हणावे लागेल. परंतु भारत हा माझा देश आहे. तिथे जर काही गोष्टी योग्य घडत नसतील तर भारताबाहेर जाण्याची भाषा करणे योग्य नाही. देशात राहूनच परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत लेखक आनंद म्हसवेकर यांनी व्यक्त केले.
आमिरला असे वाटणे फारच दुर्दैवी आहे. हे फारच नकारात्मक बोलणे आहे. आमिरसारख्या सेलीब्रेटीने असे बोलणे म्हणजे देशाची प्रतिमा खराब करण्यासारखे आहे, असे मत दिग्दर्शक विजू माने यांनी व्यक्त केले.
यापूर्वी भारतात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. निर्घृण हत्या झाल्या आहेत. तेव्हा आमिरला कधी असे वाटले का नाही? त्याचे हे विधान बेजबाबदार नागरिकाचे आहे, अशी टीका लेखक हृषीकेश कोळी यांनी केली.